

जागृत देवस्थान, नवसाला पावणारी, माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी देवी असा तळवलीच्या (ता. गुहागर) श्री सुकाई देवीचा महिमा आहे. देवदीपावलीचा उत्सवाच्या निमित्ताने येथे मोठी जत्रा भरते. शिमगोत्सवात माडवळ नाचवत आणणे आणि पालख्यांची भेट हे दोन कार्यक्रम म्हणजे आनंदाची, उत्साहाची जणू पर्वणीच. कोणे एके काळी सुकाई देवी बारा गाव बारा कोंडात फिरत असे. पुढे नथ शोधुन देणाऱ्या पेवेच्या ग्रामदेवतेला श्री झोलाई देवीला ही गावे तिने बक्षिस दिले. अशी आख्यायिका या देवीबद्दल सांगितली जाते.
गुहागर तालुक्यापासून सुमारे 20 ते 22 किमी अंतरावर असणाऱ्या तळवली गावाच्या ग्राममंदिरात मुख्य देवता श्री सुकाई देवी सह श्री काळकाई, श्री काळेश्री, श्री वाघजाई आणि शिवस्वरुप श्री खेम या देवता विराजमान आहेत. असे सांगतात की, तळवलीची श्री सुकाई देवी शिमगोत्सवात बारा गावांना भेट देत असे. अंजनवेल, वेलदूर, धोपावे, रानवी, पवारसाखरी, पालपेणे, साखरी त्रिशुळ, पेवे, परचुरी आदी बारा गाव बारा कोंडांमध्ये सुकाईदेवीची पालखी येते असे. त्या काळात या बारा गावांमध्ये जाताना नद्या, खाडी पार करावी लागायची.
एकेवर्षी या प्रवासात सुकाई देवीची नथ हरवली. भक्तांनी नथ शोधण्याचा खूप प्रयत्न केला. अखेर देवीनेच माझी नथ शोधुन देणाऱ्याला बारा गाव बारा कोंड बक्षिस म्हणून देईन असे सांगितले. योगायोगाने ही नथ श्री सुकाई देवीची बहीण आणि पेवेची ग्रामदेवता श्री झोलाई देवीला सापडली. सुकाई देवीने आपले वचन पूर्ण करत बारा गाव बारा कोंड पेवेच्या ग्रामदेवतेला बक्षिस म्हणून दिले. तेव्हापासून शिमगोत्सवाच्या काळात पेवेची ग्रामदेवतेची पालखी या बारा गावांमध्ये जावू लागली. स्वाभाविकपणे पेवेची ग्रामदेवता शिमगोत्सवात तळवलीच्या श्री सुकाईदेवीला भेटण्यासाठीही येते. फाल्गुन शुध्द दशमी याच दिवशी पेवेची श्री झोलाई देवी श्री सुकाई देवीला भेटण्यासाठी येते.
अनेक वर्ष ही परंपरा सुरु आहे. श्री झोलाई देवीची पालखी येण्याचे दिवशी (फाल्गुन शुध्द दशमी) श्री. सुकाई देवीची पालखी अर्ध्या वाटेवर जातात. तेथून दोन्ही पालख्या वाजत गाजत तळवलीच्या सहाणेवर येतात. या ठिकाणी रिंगण आखलेले असते. सहाणेवर दोन्ही पालख्या आल्या की, दोन्ही गावचे मानकरी पालख्या घेवून रिंगणात जातात. तेथे पालख्या नाचविल्या जातात. त्यानंतर रिंगणाचे मध्यभागी जमिनीवर पालख्या समोरसमोर ठेवल्या जातात. त्यानंतर दोन्ही पालख्या खुरांवर उचलून घेतल्या जातात. दोन्ही पालख्या एकमेकाला चिकटवून गळाभेट सोहळा पार पडतो. यावेळी दोन्ही पालख्यामधील नारळांची अदलाबदली होते असे म्हणतात. हा संपूर्ण सोहळा पहाण्यासाठी दोन्ही गावांमधील ग्रामस्थ गर्दी करतात. शिमगोत्सवातील माडवळ आणणे हा देखील मोठा उत्सव. होळीच्या दिवशी पालखी देवळातुन सहाणेवर ढोल-ताश्यांच्या गजरात आणली जाते.यावेळी आंब्याचे झाड माडवळ म्हणून नाचवत आणण्याची प्रथा आहे. यावेळी मुंबई-पुण्यातून ग्रामस्थ आई सुकाई देवीच्या दर्शनासाठी आवर्जून गावी येतात. देवीचा आशिर्वाद मिळावा, देवीचे काम करता यावे या भावनेतून माडवळ उचलण्याची सेवा करण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतात. ढोल ताशांच्या गजरात, सनईच्या सुरात, गुलालाची उधळण करत अत्यंत मनोभावाने, उत्साहाने माडवळ सहाणेवर आणला जातो.
श्री सुकाई देवी माहेरवाशिणींची पाठराखण करते अशी श्रद्धा गावातील मुलींमध्ये आहे. त्यामुळे लग्न होवून सासरी गेलेल्या माहेरवाशिणी शिमगोत्सवात मुद्दाम माहेरी येतात. ग्रामदेवता श्री सुकाईदेवीची ओटी भरतात. आपलं गाऱ्हाणं मांडतात. सौभाग्याच आणि सुखी संसाराच दान मागतात. जन्मदात्री आई प्रमाणेच आई सुकाई देवी देखील आपली काळजी घेईल हा विश्र्वास त्यांना आहे.
तळवलीच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात नारळी पौर्णिमा म्हणजेच जागरी पौर्णिमा, दीपावली अमावस्या तसेच शिमगोत्सवात देवीला रूपे लागते. देव दिवाळीच्या दिवशी मंदिरात मोठी जत्रा भरते. भजन, नमन आदी पारंपरिक कार्यक्रम यावेळी सादर केले जातात.

