गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार भास्करराव जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधर्म उर्फ बनाशेठ आरेकर (वय 54) यांचे शनिवारी सकाळी 9.30 वाजता चिपळूण येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Sudharm alias Banasheth Arekar (age 54), an ex-officio director of Guhagar Education Society, a social activist and a loyal activist of MLA Bhaskarrao Jadhav, died of a heart attack at 9.30 am on Saturday while undergoing treatment at a private hospital in Chiplun.
श्री. बनाशेठ आरेकर हे खालचापाट येथील गोपालकृष्ण नाव असलेल्या घरात राहत होते. सगळीकडे ते बनाशेठ म्हणून परिचित होते. गेली अनेक वर्षे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध संचालक म्हणून कार्यरत होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.
आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर तालुक्याचे पालकत्व घेतले तेव्हापासून ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत होते. गुहागरमध्ये जाधव यांचा कोणताही कार्यक्रम असो बनाशेठ हे दिसणारच. त्यांना शेतीची प्रचंड आवड होती. परिसरातील अनेक महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला होता. श्री वराती देवीच्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. शिवाय गावातील प्रत्येक उपक्रमातही मोठे योगदान दिले आहे. बनाशेठ यांचे चिपळूण येथे यापूर्वी दुकान असल्यामुळे अनेक व्यापारी मित्र निर्माण केले होते.
बनाशेठ यांना शुक्रवारी रात्री 2.30 वाजता हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी चिपळूण येथे हलविण्यात आले. मात्र, सकाळी 9.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. निधनाची बातमी शहरात कळताच सर्वत्र शोककळा पसरली.
शनिवारी सायंकाळी 6 वाजता खालचापाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चत पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.