गुहागर- दापोली तालुके जोडणार; दिवाळीपासून प्रवाशांना प्रत्यक्ष सेवा
गुहागर : तालुक्यातील परचुरी आणि दापोली ह्या दोन तालुक्याला जोडणाऱ्या परचुरी-फरारे फेरीबोटीची सोमवारी यशस्वी चाचणी आली. यावेळी या फेरीबोटचे सर्वेसर्वा डॉ.चंद्रकांत मोकल हे उपस्थित होते. या फेरीबोटीमुळे गुहागर-दापोली हे तालुके जोडले जाणार असून तालुक्यातील प्रवासी वर्गाला मुंबई अंतर देखील कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. दिवाळी सणापासून ही फेरीबोट सेवा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
The Parchuri-Farare ferry boat, which connects the two talukas of Parchuri and Dapoli, will connect Guhagar-Dapoli talukas and will also reduce the distance between Mumbai and the traveling community in the taluka. The ferry service will be available to passengers from Diwali.
डॉ.चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी यापूर्वी धोपावे-दाभोळ,जयगड-तवसाळ आदी फेरीबोट सेवा देखील सुरू केल्या असून प्रवासी वर्गाला त्या सोयीच्या ठरल्या आहेत.वेळ व खर्च याची बचत यामुळे प्रवासीवर्गाची झाली आहे.आता परचुरी-फरारे ही फेरीबोट सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा गुहागर-दापोली तालुके जोडले जाणार असून गुहागर-परचुरी(25 किमी),परचुरी-फरारे फेरीबोट मार्ग (1.5 किमी),फरारे- उन्हवरे मार्ग(5 किमी), उन्हवरे – वाकवली(25 किमी), वाकवली-खेड(15किमी) मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग असा हा मार्ग असणार आहे. या नव्या मार्गामुळे गुहागरवासीयांना मुंबई प्रवास करताना सुमारे 70 किमी इतके अंतर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तळवली- परचुरी बाजारपेठेला महत्व येणार दरम्यान परचुरी – फरारे ही फेरीबोट सेवा सुरू झाल्यानंतर तळवली व परचुरी येथील बाजारपेठ विस्ताराला अधिक संधी मिळणार आहे.या मार्गावरून वाहतुकीची रहदारी वाढती राहणार असल्याने आता येथील बाजारपेठेला देखील महत्व प्राप्त होणार असून रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे.


पर्यटन विकासालाही संधी
सध्या गुहागरमध्ये येणारे पर्यटक जयगड तवसाळ फेरीबोट, दाभोळ धोपावे फेरीबोट आणि चिपळूण मार्गे गुहागर या तीन मार्गांचा वापर करतात. दाभोळ धोपावे फेरीबोट सेवा सुरु झाल्यानंतर रानवी पासून गुहागरपर्यंत काही पर्यटन निवासस्थाने विकसीत झाली. तेथे रहाणाऱ्या पर्यटकांमुळे आजुबाजुच्या निसर्गरम्य स्थळी जाणाऱ्यांची संख्या वाढली. याच पध्दतीने तवसाळमध्येही पर्यटन व्यवसाय सुरु झाला. चिपळूण गुहागर मार्गावरही पर्यटन निवासांच्या सोयीमध्ये वाढ झाली. आता परचुरी फरारे मार्ग सुरु झाल्यानंतर सत्यवान दर्देकर यांच्या आजोळ ॲग्रो टुरिझममध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. दापोली तालुक्यातील मंडळीही एक दिवसाच्या पर्यटनाकरता परचुरीचा पर्याय निवडतील. त्याचप्रमाणे परचुरी ते चिखली दरम्यान पर्यटन निवासाची व्यवस्था करणारा उद्योग विकसीत होईल. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून गुहागर तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.