गुहागर : राष्ट्रीय सैनिक संस्था या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व गिमवी येथील रहिवासी सुभाष जाधव यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या ते शेती व शेळीपालन व्यवसायात गुंतले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधिकारी सुभाष जाधव यांनी आपल्या कारकीर्दीतील अवैध धंद्यांवर धाडी मारून या लोकांनी विरोधात निर्माण केली होती. रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. यामुळे ते बेडर अधिकारी म्हणून ओळखले जात होते. सेवानिवृत्तीनंतर शेती, शेळीपालन व हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत. त्याचबरोबर गेल्या महिनाभरापूर्वी पोलीस भरती विषयी गिमवी पंचक्रोशीतील सुशिक्षित तरुणांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. एकंदरीत सेवानिवृत्तीनंतर सुभाष जाधव हे शांत बसलेले नाहीत, असे दिसून येत आहे. याच कामाची दखल घेऊन राष्ट्रीय सैनिक संस्थेने सुभाष जाधव यांच्यावर रत्नागिरी जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवली आहे. या पदाला आपण न्याय देऊ व या संस्थेची ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, असे सुभाष जाधव यांनी सांगितले.