गुहागर (प्रतिनिधी): छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे मोठ्या संघर्षातुन निर्माण झाले आहे.अनेक वादळे या स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींनी झेलली आहेत.त्यामुळे संघर्ष हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.असे प्रतिपादन प्रा.अमोल जड्याळ यांनी केले.तळवली डावलवाडी येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सरपंच मयुरी शिगवण,उपसरपंच अनंत डावल,ग्रा.पं. सदस्य संतोष जोशी,सचिन कळंबाटे,पूर्वा पवार,प्रतीक्षा जाधव,सविता शिंदे,मानसी पोफळे,माजी उपसरपंच राकेश पवार,तंटामुक्त समिती अध्यक्ष उत्तम पवार,डावलवाडी अध्यक्ष प्रदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना प्रा.जड्याळ म्हणाले की,शिवरायांनी आपल्या रयतेच्या मनात स्वराज्याचा एक विश्वास निर्माण केला आणि या विश्वासाच्या बळावरतीच त्यांना स्वराज्याचे तोरण बांधणे शक्य झाले. शिवरायांनी आपल्या रयतेला गुलामगिरीतुन मुक्त करून आपले स्वतःचे रयतेचे राज्य नेमके काय असते हे संपूर्ण जगाला दाखवून दिले.शिवरायांनी रयतेवर कधीही दडपण ठेवले नाही. आपल्या रयतेच्या विचारांचे स्वराज्य निर्माण करण्याची संधी त्यांनी आपल्या रयतेला दिली. यामुळेच आपल्याला स्वराज्य घडलेले पहावयास मिळाले.छत्रपती शिवरायांची कीर्ती ही जगभरात होती साडेतीनशे वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये लंडन गॅझेट हे वृत्तपत्र प्रसिद्ध होत असे त्या वृत्तपत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘द किंग ऑफ इंडिया शिवाजी राजा’ केला असेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुळे यांनी केले.