कथा पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावसकर यांच्या संशोधनाची
लेखक : अनिल अवचट
तीन तासांनी मुलाने पहिला हुंकार दिला. ब्लडप्रेशर वाढत जाऊन नॉर्मलला आलं. परत मुलाला विंचू चावल्याच्या जागी ठणका जाणवू लागल्या. बावस्कर आनंदाने नाचू लागले. उपसरपंचांना कळेना, की वेदना व्हायला लागल्या तर डॉक्टर नाचताहेत का ? बावस्कर म्हणाले, “वाचला तुमचा मुलगा. आता विंचूदंशाने कोणाला मी मरू देणार नाही.”
मी अभय बंगवर लेख लिहिला नसता, तर माझी डॉ. बावस्करांची ओळखही झाली नसती. मी राणी, अभयच्या (बंग) कामावर आणि संशोधनावर लेख लिहिला. तो वाचून महाडच्या डॉ. गोखल्यांचं पत्र आलं की “आमच्या महाडमध्येही असाच एक संशोधक आहे. ज्याचं संशोधन लॅन्सेट’ (जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल) मध्ये प्रसिद्ध झालंय. मला आश्चर्यच वाटलं. ” कारण लॅन्सेटमध्ये ओळ छापून यायलाही फार लायकी लागते. मी ताबडतोब त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांचे पेपर्स मागवून घेतले. ते वाचताना थक्कच झालो. मग महाडला त्यांना भेटायला गेलो. नंतर तेही घरी आले.
बावस्करांकडे पाहिलंत तर, जगप्रसिद्ध संशोधक तर दूरच, पण ते डॉक्टरही वाटणार नाहीत. रस्त्याने जाताना जी ‘साधी’ माणसं दिसतात, त्यातले एक. उभट चेहरा, चष्मा, कपाळ थोडं पुढे आलेलं, केस दोन्ही बाजूंनी मागे गेलेले, दात किंचित पुढे. उंच, शिडशिडीत, बोलण्याला खेडूत वळण. त्याच वळणाची इंग्रजी वापरायची अतोनात हौस, बोलताना थोडं थांबून ‘काय, आलं का लक्षात’, म्हणून नंतर काही वेळ गूढ शांतता निर्माण करायची शैली; अशी त्यांची वैशिष्ट्यं. पण या साध्या माणसाचा पराक्रम समजून घेतला तेव्हा वाटलं, क्या बात है, निसर्गात प्रत्येक माणसाचं डोकं कसं वेगळं घडलेलं असतं ! (Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research)
बावस्कर मराठवाड्यातले, एम्. बी. बी. एस्. नागपूरला झाले. आणि नोकरी करायला आले कोकणात, महाड जवळच्या बिरवाडी गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात. थोरले भाऊ कोकणातच जांभूळपाड्याला अॅग्रिकल्चर सुपरवायझर म्हणून नोकरी करीत होते. भाऊ आणि ते बिरवाडीला निघाले. वाटेत पालीच्या देवळात रात्रीचा मुक्काम केला. भाऊ म्हणाला, “खाटा मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं. पण जरा जपूनच राहा. रात्री दिव्याशिवाय इकडं तिकडं जाऊ नको. इथले विंचू फार विषारी असतात. ते चावले तर माणूस मरतोच.”
बावस्करांना आश्चर्य वाटले. एकतर त्यांच्या गावाकडे विंचू होते. पण चावला तरी काही काळ झिणझिण्या येऊन नंतर तो उतरत असे. आणि विंचवाने माणूस मरतो हे एम्. बी. बी. एस्. च्या कुठल्याही पुस्तकात लिहिलं नव्हतं. आणि सांगितलंही गेलं नव्हतं. ते विचार करीत पडले, उद्या अशी केस आपल्याकडे आली तर आपण काय करणार आहोत ? आणि खरोखरीच ते बिरवाडीला आल्या आल्या कळलं की पाचच दिवसांपूर्वी एक मुलगी विंचू चावून मेली. ती आबा बागडे नावाच्या सरपंचांची १८ वर्षांची मुलगी. बावस्कर त्यांना भेटायला गेले. विंचू चावल्यापासून तो ती मुलगी जाईपर्यंत काय काय, कसं कसं झालं ते विचारलं. उलट्या, घाम, दम लागला. खोकला सुरू झाला. थुंकीतून रक्त पडत होते, एवढे कळले. त्यावरून यांना खुलासा काही प्राप्त झाला नाही. पण ‘मुलगी शेवटपर्यंत बोलत होती’ हे ऐकल्यावर त्यांनी एक निष्कर्ष काढला की सेंट्रल नर्व्हस सिस्टीम (मेंदू – मज्जारजू – मज्जातंतू ) ला बाधा झाली नव्हती.
मग त्यांनी जवळच्या गावामधल्या डॉक्टरांना विचारले. काहीजण म्हणाले, ‘विषामुळे रक्ताचे पाणी होतं’. काही म्हणाले, ‘आम्ही अशा केसेस ठेवूनच घेत नाही. आल्या आल्या परत पाठवतो.’ थोडक्यात तिकडूनही काही कळेना. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे अशा केसेस येतात. आधीच्या डॉक्टरांच्या काही नोट्स मिळतात का, म्हणून त्यांनी मागचे केसपेपर्स काढले. पण ते इतके त्रोटक, की काही समजेना. मोदी या लेखकाच्या टॉक्सिकॉलॉजीच्या पुस्तकात डॉ. मुंडले यांचा संदर्भ मिळाला. योगायोगाने ते जवळच्या गोरेगाव या गावी राहत होते. त्यांचा ६१ साली ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये लेख आला होता. त्यात त्यांच्या १४ वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये विंचू चावल्याच्या ७८ केसेस आल्या आणि त्यातल्या २३ दगावल्या, असे होते. बावस्कर त्यांना भेटलेही. (Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research)
बावस्करांकडे अशा केसेस येऊ लागल्या
ते अशा केसेसवर पुस्तकात दिलेले उपचार करायचे. पण उलट त्या झपाट्याने जायच्या. ते जवळच्या अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलला केसेस घेऊन जायचे; पण डेडबॉडी घेऊन परत यावे लागे. आठवड्यात दोनदोन मृत्यू त्यांच्या दवाखान्यात या कारणाने होऊ लागले. बावस्करांचं डोकं फिरायची पाळी आली. त्यांनी काही केसेस पुण्याला, मुंबईला प्रसिद्ध हॉस्पिटलकडे पाठवल्या. पण अगदी अद्ययावत आयु. सी. यू. (इन्टेंसिव्ह कार्डियक युनिट)मध्ये अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पुढ्यातही माणसे जायची, पण ते काही करू शकत नसत.
बावस्कर सांगत होते, “लहान लहान मुलं यायची. खेळताना दगड उचलायला जायचे आणि विंचू चावायचा. मोठी तगडी माणसं यायची. कुणी अनवाणी असल्याने पायाला विंचू चावायचा. शेतात गवताची गंजी उचलायला गेले की चावला विंचू, खणायला गेले विंचू. उबेसाठी गवताच्या छतात विंचू असतात, ते खाली पडतात आणि चावतात. बुटात जाऊन बसतात. कपड्यांच्या खिशात जाऊन बसतात. आणि चावला की माणूस चाललाच वर ! तिथले लोक सांगायचे मला की विंचू चावला की आम्ही एकीकडे मयतीची तयारीच करू लागायचो. एक लग्न तर शहरात झालं. मुलीचं गाव इकडचं. म्हणून देवदर्शनाला ती इथल्या खेड्यात आली आणि इकडे विंचू चावला. दोन दिवसांत ती नवीन लग्न झालेली तरुण मुलगी बघता बघता गेली. लहान मुलं जायची, तेव्हा मला फार वाईट वाटायचं. दोन दिवस त्यांच्या उश्या-पायथ्याला मी बसायचो, हातपाय चेपून द्यायचो. त्यामुळे जवळीक निर्माण होतेच ना. ते मूल गेलं की नातेवाईक रडायला लागायचे, त्याबरोबर मीही रडायचो.’ (Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research)
हा विंचू आहे तरी कसा ?
मी विचारलं, “पण हा विंचू आहे तरी कसा ? आम्ही इंगळी म्हणतो तसा का ? ते म्हणाले, “लोकांचा गैरसमज आहे. इंगळीने माणूस मरत नाही. हा छोटा, लालसर विंचू असतो. ‘मेसोबथस रॅम्युलस’ ( असं त्याचं पुस्तकातलं नाव आहे.” त्यांनी उठून त्यांच्या आतल्या खोलीतून दोन बरण्या आणल्या. त्यात फारमॅलिनच्या द्रावात एकेक विंचू ठेवला होता. एक मोठ्ठी काळी इंगळी ठेवली होती. दुसरा कुठेही दिसतो तसा साधा विंचू होता. बावस्कर म्हणाले, “विषारी आहे की नाही हे ओळखायची एक खूण आहे. नांगी जाड आणि पुढचे, ज्यात तो भक्ष्य पकडतो ते पाय लहान किंवा पातळ, तर विंचू विषारी. आता इंगळी बघा. पुढचे पाय खूप जाड आहेत. पण नांगी पातळ आहे. बिनविषारी.”
मला नांगीच्या शेवटी शेंगदाण्याच्या आकाराची ग्रंथी आणि त्याला हुकासारखा काटा दिसला. तो पुढे कसा आणून मारत असेल असा प्रश्न पडला. बावस्कर म्हणाले, “तो उलटा, मागे मारतो. धोका वाटला, तर मागे नांगी मारून तसेच पुढे पळून जातो. हा माणसाच्या आधी लक्षावधी वर्ष जन्मलेला चिवट प्राणी. अणुबॉम्बच्या स्फोटानंतर फक्त हाच प्राणी तिथं जिवंत राहिला. जग कशामुळे नष्ट झालं तरी हा जगेल असं संशोधक म्हणतात. तीन तीन महिने अन्न नाही मिळालं तरी जगू शकतो. परत हा कॅनिबल आहे. “म्हणजे ?” स्वतःच्या जातीला खाऊ शकतो.
नंतर मी एक लेख वाचला. त्यात होतं, विचवाचे नर मादी, आपण बॉल डान्स करतो तसे प्रियाराधन करतात. पण समागम झाल्यावर मादीला इतकी भूक लागते की ती त्या नर विंचवालाच खाऊन टाकते. ‘विंचवाचे बिहाड पाठीवर’ अशी म्हण आहे. त्याप्रमाणे खरोखरीच पाठीवर पिल्लांना घेऊन ‘विंचवीण’ इकडून तिकडे जात असते. पण ती पिलेही तिला खातात. माझ्या मित्राने पाहिलेले दृश्य सांगितले. विंचवाची छोटी छोटी पिल्ले विचविणीच्या पाठीवर होती आणि तिला पिल्ले खात राहिल्याने ती अगदी पांढरीफटक (पारदर्शक) पडली होती आणि मरायच्या वाटेवर होती.’
शोधाच्या वाटेवर
(Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research)
बावस्करांनी त्या वेळच्या कात्रणांची फाईल दाखविली. तिथली जिल्हा, तालुका छोटी छोटी वर्तमानपत्रे. पण त्यात अधून मधून बातम्या याच. ‘विचू- दंशाने अमुक मृत्युमुखी’. बावस्करांनी हाफकीन इन्स्टिट्युटला लिहिले, याच्यावर काही ‘अँटीव्हेनॉम’ (विषाचा उतारा) आहे का ? त्यांचे नकारार्थी उत्तर आले. जगात असे अँटीव्हेनॉम आहे; पण ते तेवढे परिणामकारक नाही. असे विषारी विंचू भारतातल्या कोकणपट्टीत आहेत, कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात आहेत, आंध्र, इस्रायल, सौदी अरेबिया, ब्राझील व मेक्सिको येथे आहेत. हे अँटिव्हेनॉम खूप महाग, भारतात उपलब्ध नाही. म्हणून तोही रस्ता बंद झाला. शहरात पाठवून उपयोग नाही. कार्डियॉलॉजिस्टच्या समक्ष माणसं मरत होती. काही प्रवासात मरत होती. मग बावस्करांनी ठरवलं की आता पेशंट कुठेही पाठवायचे नाहीत. जे काही व्हायचं ते इथंच होईल. उपाय सापडो न सापडो. आपण या केसेसची निरीक्षणं तर करून ती संग्रहित करूया. म्हणून मग ते पेशंट आला की मुक्काम दवाखान्यातच करून दहा-दहा मिनिटांनी नाडीचे ठोके, श्वासोच्छ्वासाचा दर मोजत, ब्लडप्रेशर घेऊन ठेवत. स्टेथॉस्कोपने हृदयाची, फुप्फुसाची परिस्थिती नोंद करून ठेवू लागले.
त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटपैकी चाळीस ते पन्नास टक्के पेशंट मृत्यू पावत होते. जे वाचत होते, त्यांच्यावरून दिसत होते, की विंचू चावलेल्या सर्वच पेशंटना चावल्याच्या जागी प्रचंड वेदना होत असत. आणि त्यापुढे त्यांचे दुखणे जात नसे. आपोआप उतार पडून ते वाचत. काहींच्या वेदना थांबत, पण ते बरे व्हायच्या ऐवजी रोगाच्या पुढच्या टप्प्यावर जात आणि तिथून गुंतागुंत सुरू होई. काही आणखी पुढच्या टप्प्यावर जाऊन मृत्युजवळ जात. तर काही परत येत. परत येताना त्यांच्या वेदना परत सुरू होत. आणि मग काही तासांनी त्यांना उतार पडत असे. या वेदना परत येणे हे चांगले चिन्ह, ही बावस्करांना चालना देणारी बाब ठरली.
बरं, जी काही गुंतागुंत होई, त्यावरून एक गोष्ट उघड झाली की विषाची सर्व अॅक्शन हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होते. सापाच्या विषाच्याबाबत ती मज्जासंस्थेवर – नर्व्हस सिस्टिमवर असते. विंचवाच्या विषामुळे काही पेशंटमधे बरोबर उलटं म्हणजे ती अॅक्शन खूप कमी व्हायची. ब्लडप्रेशरचंही तसेच. काहींचं वर चढायचं तर काहींचं खूपच कमी झालेलं असायचं. हातपाय गार पडलेले असायचे. खोकला सुरू होई. मरणाच्या सर्वांच्या तोंडाने फेस येत असे. त्यात लालभडक, शुद्ध रक्तही दिसे.
आपल्या शरीरात मध्यवर्ती अशी मज्जासंस्था आहे. (सेंट्रल नर्व्हस सिस्टिम) त्यात मेंदू, मज्जारज्जू आणि स्नायू, त्वचा आदीपर्यंत जाणारे मज्जातंतू आहेत. त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. पण मज्जासंस्थेला समांतर, पण आपले नियंत्रण नसलेली दुसरी एक मज्जासंस्था आहे. तिचे नाव अॅटॉनॉमिक नर्व्हस सिस्टिम. न्यातही दोन प्रकार आहेत. एक सिंपर्थॅटिक आणि दुस.री रासिंपर्थटिक, दोन्हीच्या अॅक्शन्स एकमेकांविरोधी आणि त्यामुळे तोल साधणाऱ्या.
या विंचूदंशानंतर विविध प्रकारची चिन्हे दिसत. काही पॅरासिंपरथेटिक उत्तेजित असल्याची, तर काही सिंपर्थेटिकची. बावस्करांनी त्यांची प्रतवारी करून ठेवली. काहींना खूप घाम येत असे. उलट्या होत असत, लाळ गळत असे. पुरुषांचे, लहान मुलांचे लिंग ताठ होत असे. (याला प्रायोपिझम म्हणतात). बुबुळाचे मधले वर्तुळ विस्तारत असे. ही सगळी पॅरासिंपटिक उत्तेजित झाल्याची चिन्हं. पुढची ब्लडप्रेशर, हाटरिट वगैरे सगळी सिंपथेंटिक उत्तेजेची चिन्हं.
शेवटी पेशंटच्या तोंडात फेस येतो. त्याचे कारण बावस्करांनी निश्चित केले की हा पल्मनरी इडिमा. म्हणजे फुप्फुसात पाणी साठतेय. हे प्लुरसी नव्हे. प्लुरसीमध्ये फुप्फुसाच्या आवरणात पाणी साठते. इथे चक्क फुप्फुसात असते. याचा अर्थ हृदय इतके फेल झालेय की त्याच्या आकुंचन-प्रसरणातून फुप्फुसात शुद्ध झालेलं रक्त ते ओढून घेऊ शकत नाही. म्हणून फेसावाटे जे रक्त येई, ते ऑक्सिजन मिळालेले शुद्ध, तांबडेजर्द रक्त असे. मृत्यूकडे जायचा शेवटचा टप्पा म्हणजे पल्मनरी इडिमा.
या सगळ्याचा उलगडा करायला बावस्करांकडे काही साधने नव्हती. ते साध्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरचे एक डॉक्टर. स्टेथोस्कोप आणि ब्लडप्रेशर ॲपारॅटशिवाय काहीच हाताशी नाही. (मधल्या काळात ते एम्. डी. इ. सी. जी. मशीन कामी येऊ लागले. पण ते तेवढेच.) झाल्यावर त्यांनी एक निश्चित केलं, की या विषामुळे सर्व अॅटॉनॉमिक नर्व्हस सिस्टिमच स्टॉर्म’ मधे जातीय. उत्तेजित होतीय. यातल्या पॅरासिंपरथेटिक उत्तेजनाकडे त्यांनी दुर्लक्ष करायचं ठरवलं. पेशंटला घाम येतो. लाळ खूप गळते किंवा उलट्या होतात. त्याने पाणी शरीराबाहेर जातं. असं असलं तरी तोंडातून पाणी घेऊन तो तोटा भरून काढता येईल. प्रायोपिझमने शरीराचं काहीच बिघडत नाही. खरी धोकादायक ठरतील, ती सिंपथेंटिकची लक्षणे. Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research
पण पुस्तकात जी अॅट्रोपिन, अँटिहिस्टॅमिनिक्स औषधे द्यायला सांगितली होती, ती या पॅरासिंपथेटिक उत्तेजनाला विरोध करणारी. त्यामुळे ती लक्षणे ब्लॉक व्हायची. पण त्याने सिंपर्थॅटिक सिस्टीम आणखीनच उत्तेजित व्हायची. (कारण या दोन्ही सिस्टिम परस्परविरोधी काम करीत असतात.) त्यामुळे पेशंट झपाट्यानेच मृत्यूकडे जायचा. ते उपचार प्रथम बावस्करांनी थांबवले. काय करायचं नाही, ते निश्चित झाले. टेक्स्टबुक्स प्रमाण मानून आपण चालतो, ते बहुतेक वेळी रही ठरत असलं तरी इथे ते मृत्यूची वाटच दाखवीत होते.
सिंपर्थेटिकच्या बाबतीत त्यांनी कशातून काय होत जाते याचा अभ्यास केला. मला बावस्कर समजावून सांगत होते. ते झपाट्याने खूप तांत्रिक शब्द वापरीत, उड्या मारीत पुढे जात. मी त्यांना थांबवून एकेक समजावून घेई. जे डोळ्यासमोर उभे राहिले, ते अगतिक हृदय. (साहित्यिक अर्थाने नव्हे.) मला या हार्ट, कार्डिओग्रॅममधल्या टर्स कळत नाहीत. पण या सगळ्यातून मी उलटीकडून विचार करू लागलो, तसा उलगडा होत गेला. बावस्करांना विचारलं, असंच होतं का ? त्यांनीही मान डोलावली. यात माणूस कशामुळे जातो ? तर पल्मनरी इडिमामुळे, म्हणजे तोंडातून रक्तमिश्रित फेस यायला लागतो तेव्हा. हा इडिमा किंवा फुप्फुसाला सूज कशामुळे येते ? तर फुप्फुसात शुद्ध झालेले रक्त हृदय खेचू शकत नाही. तसे का करू शकत नाही ? तर ते फेल्युअरमधे गेलेले असते. त्यातल्या स्नायूंची ताकद संपून ते शिथिल झालेले असते. ते फेल्युअरमधे का जाते ? तर हातापायांच्या, परिघावरच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावलेल्या असतात. त्या तशा का आकसतात ? तर विंचवाच्या विषामुळे अॅड्रेनल ग्लँड उत्तेजित होऊन, भरपूर अॅड्रेनलिन रक्तवाहिन्यात ओतले जाते म्हणून.
औषध सापडलं
काय होतंय त्याचा उलगडा तर झाला. पण काय करायचं हा प्रश्न होताच. रूढ असलेली अॅट्रोपिन ट्रीटमेंट तर त्यांनी बंदच केलेली. पुण्याला बी. जे. मेडिकलच्या, मुंबईत के. ई. एम्. , जे. जे., हाफकिन इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत अधूनमधून शनिवार रविवार ते जात आणि सगळी जर्नल्स् वाचून काढीत. जे अँटिव्हेनॉम म्हणून परदेशात वापरले जात होते, त्याच्याही मर्यादा त्यांच्या ध्यानात येत होत्या. तिकडे परदेशांतही अँटिव्हेनॉम दिले तरी पुढे हृदयाबाबतच्या होणाऱ्या परिणामांसाठी रुग्णांना आय. सी. यू. (इन्टेंसिव्ह कार्डियक युनिट) मधे ट्रीटमेंट द्यावी लागत होतीच. कारण सापाप्रमाणे हे विष पसरत जाऊन नुकसान करणारे नव्हते (म्हणूनच विंचू चावल्यावर पट्टी बांधून टुर्निकेटचा उपयोग होत नसे) तर जो अॅटॉनॉमिक नर्व्हस सिस्टिमला विषाचा झटका बसला आणि अॅड्रेनलिन रक्तात ओतलं गेलं की पुढची गुंतागुंत आपोआपच साखळी प्रक्रिया सारखे चालू होत राही. ती परतवण्याला काहीच इलाज सापडत नव्हता. हार्ट फेल्युअरची एरवी ‘डिजिटॅलिस’ वगैरे औषधंही लागू पडत नसत. थोडक्यात रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअर म्हणजे औषधांना दाद न देणारे ‘कोडगे’ हार्ट फेल्युअर होते. Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research
बावस्कर पुण्याला येऊन एम्. डी. करून गेले. त्या काळात आय. सी. यू. चा अनुभव घेतला होता. तिथल्या उपाययोजना अंगवळणी पडलेल्या होत्या. पण तिढा सुटत नव्हता. त्यांच्या मनात एकदम कल्पना आली की सगळीकडच्या, विशेषतः परिघावरच्या (पेरिफेरल व्हासो कॉन्स्ट्रिक्शन) रक्तवाहिन्या आकुंचित पावतात. त्यांना आपण रक्तवाहिन्या प्रसरण पावणारी व्हासोडायलेटर्स औषधे दिली तर ? पण त्यावेळेस ब्लडप्रेशर इतके कमी, म्हणजे ६०च्या आसपास आलेले असते. त्यावेळी ही औषधे दिली तर ब्लडप्रेश आणखी खाली येऊन पेशंट मरून जाईल. पण एक मन सांगत होते की त्या औषधांनी रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या की रक्तपुरवठा सुरळीत होईल. हृदयावरचे (अक्षरशः ) दडपण कमी होईल. त्यामुळे फुप्फुसातले शुद्ध रक्त हृदयाकडे खेचलं जाऊन फुप्फुसाची सूज कमी होईल आणि या सगळ्याने ब्लडप्रेशर कमी व्हायच्या ऐवजी वाढेल. या दोहोतले नेमके काय होईल, ते सांगता येत नव्हते.
याच सुमारास, म्हणजे ऑक्टो. ८३ मधे, एक मुलगा विंचू चावल्यामुळे अॅडमिट झाला. नांदवी (मुख्यमंत्री ना. मनोहर जोशी यांचं गाव) गावच्या उपसरपंच येळमकर यांचा ८ वर्षांचा मुलगा. रात्री आठ वाजता अॅडमिट झाला. रूटीन मेंटने उतार पडेना. सकाळी नऊ वाजता त्याला पल्मनरी इडिमा डेव्हलप झाला. आता काय होणार, हे उघड झाले. बावस्कर सांगत होते, “मी पेशंटला कधी अशा अवस्थेत परत पाठवत नाही. आय ट्रीट हिम टू द डेथ. मी त्यांना म्हटलं, एक औषध आहे माझ्याकडे. पण त्याने ९९ टक्के तो मुलगा जाईल, पण १ टक्का वाचेलही. ते म्हणाले, ‘तुम्ही ते द्या. फक्त एक करा. तो दगावलाच तर माझ्याबरोबर हे मूल घेऊन गावापर्यंत या.’ मी होकार दिला आणि तयारी केली. सलाईन लावली होतीच. वास्तविक नायट्रोप्रसाईड हे औषध हॉस्पिटलमधल्या आय. सी. यू. तच दिले जाते. पण त्या खेड्यातल्या दवाखान्यात (पोलादपूरच्या रूरल हॉस्पिटलमधे) ते सलाईनमधे मिसळले. बावस्कर नाडीवर हात ठेवून बसले. पाच-पाच मिनिटांनी ब्लडप्रेशर घेत होते. जरा सुद्धा ब्लडप्रेशर आणखी खाली जातंय असं वाटलं, तर सलाईनची ड्रिप लगेच बंद करणार होते. पण ब्लडप्रेशर स्थिर होते. अर्ध्या तासात खोकला थांबला, तीन तासांनी मुलाने पहिला हुंकार दिला. ब्लडप्रेशर वाढत जाऊन नॉर्मलला आलं. परत मुलाला विंचू चावल्याच्या जागी ठणका जाणवू लागल्या. बावस्कर आनंदाने नाचू लागले. उपसरपंचांना कळेना, की वेदना व्हायला लागल्या तर डॉक्टर नाचताहेत का ? बावस्कर म्हणाले, “वाचला तुमचा मुलगा. आता विंचूदंशाने कोणाला मी मरू देणार नाही. चोवीस तासांनी मुलगा आपल्या पायांनी चालत घरी गेला. हे ऐकताना मला अगदी आर्किमिडिजची आठवण झाली. अभय बंगला मी नंतर हे सांगितले. तो म्हणाला, “विज्ञानाच्या प्रगतीच्या सुरुवातीच्या काळात साध्या झोपड्यांमधे कित्येक महत्त्वाचे शोध लागले. याचीच आठवण झाली. पण बावस्करांचं पूर्ण समाधान झालं नव्हतं. कारण विंचू चावलेले लोक खेड्यातून त्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येणार. तिथं हे जालीम नायट्रोप्रसाईड कोण देणार ? कुठले तरी सुरक्षित औषध शोधलं पाहिजे.
शोध सुरक्षित औषधाचा
त्यांनी पुण्या-मुंबईच्या हृदयरोगतज्ज्ञांना विचारलं, जर्नल्स वाचली. एका जर्नलमध्ये ‘प्राझोसिन’ नावाच्या व्हासोडायलेटरची माहिती आली होती. पुढे त्यात म्हटले होते की, या प्राझोसिनला ‘तोंडाने देता येईल असे नायट्रोप्रसाईडच म्हटले जाते. यावरून बावस्करांनी हिंट घेतली. ड्रगची चौकशी सुरू केली. पण ते अगदी नुकतेच निघालेले ड्रग, भारतात मिळत नव्हते. पण मुंबईचे काही केमिस्ट अशी ड्रग्ज मिळवून देतात, असे ऐकले होते. एका बड्या डॉक्टरांच्या ओळखीने ते त्या केमिस्टकडे गेले. त्याने यांची खातरजमा करून घेण्यासाठी तासभर बसवून ठेवले. नंतर प्राझोसिनच्या गोळ्या हातात ठेवल्या. (आता या गोळ्या अगदी खेड्यातल्या केमिस्टकडेही मिळतात.)
पोलादपूरला आल्यावर त्यांनी प्राझोसिन वापरून पाहिलं. याला तर सलाईन नको, आणि पाचपाच मिनिटांनी तपासणी नको. चार तासांनी एक गोळी, तोंडातून. (या सगळ्या प्रकरणात पेशंट शेवटपर्यंत जागा असतो, तोंडाने पाणी पिऊ शकतो) आणि काय, पेशंट सुखरूप बाहेर येऊ लागले. त्यांच्याकडे लांबलांबून पेशंट येऊ लागले. बावस्करांच्या सुरुवातीच्या काळात ३० ते ४० टक्के मृत्यूचे प्रमाण होते, ते ८४ सालात हे औषध सापडल्यावर ६ टक्के झाले आणि ८९ सालात हे प्रमाण शून्यावर आले.
प्राझोसिनच्या केवळ व्हासोडायलेटर अॅक्शनमुळे कृतीचा उलगडाही अधिकाधिक होत गेला. विषामुळे रक्तातली इन्शुलीनची पातळी घसरते. त्यामुळे साखरेचं प्रमाण वाढून हायपर ग्लायसेमिया होतो. प्राझोसिनविषयीच्या लॅब टेस्टमधे सिद्ध झालंय की, त्याने शरीरातलं इन्शुलीन प्रॉडक्शन वाढतं. त्यामुळे उद्भवलेला तो दोष आपोआपच दूर होतो. विषामुळे हृदयाच्या पेशीमधला कॅल्शियम बाहेर येतो, प्राझोसिनमुळे तोही परिणाम उलटा होतो. असे अनेक परिणाम बावस्करांनी मला सांगितले. काही कळले, बरेच कळले नाहीत. एवढं कळलं की यांचा हात अगदी योग्य औषधावर पडलेला आहे.
नुसता शोध लावून ते थांबले नाहीत. त्याचा लोकांना उपचार व्हायला पाहिजे होता. त्यांच्याकडे तिन्ही जिल्ह्यांतून केसेस यायच्या. त्यात वेळ खूप गेल्यामुळे पेशंट दगावयाचा. त्यांना तिथल्या तिथं दोन-चार तासांत ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. म्हणून त्यांनी सर्व डॉक्टरांना ट्रेन करायचे ठरवले. स्वखर्चाने कोकणात दौरा केला आणि जे कुणी डॉक्टर असतील मग ते एम् . डी. असोत की आर. एम्. पी., एल्. एम्. पी. असोत; त्यांच्याकडे जाऊन लेक्चर्स दिली. इतके सोपे, सुटसुटीत उत्तर मिळाल्यावर य ! गेल्या तीन- चार वर्षात सबंध कोकणपट्टीत माणूस विंचू चावून मेल्याची एकही बातमी स्थानिक पेपरात आलेली नाही. बावस्करांकडे मी गेलो असताना दोन- तीन असे डॉक्टर्स त्यांना भेटायला आले होते. ते म्हणाले, ‘पूर्वी आम्ही अशा केसेस ठेवूनच घेत नसू. आता पेशंट डोलीतून येतो आणि पायांनी चालत जातो.” Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research
बावस्करांचा स्वभाव जिद्दी आणि कष्टाळू. पण नुसत्या या गुणांवर भागणार नव्हतं. तर ते संशोधक वृत्तीचे आहेत. अभय बंग जिथं शिकला, त्या नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये बावस्कर अभयला ज्युनियर होते. अभय सांगत होता, “आम्हाला त्यावेळी कळलं की फर्स्ट एम्.बी. बी. एस्. ला एक मुलगा आलाय. त्याचं ‘ग्रे’ अॅनॉटॉमीचं अख्खं पुस्तकं पाठ आहे. सिनियर मुलं त्याला बोलायचं. अमुक एक टॉपिक म्हण, की तो घडाघडा सुरू करायचा.” मी ते ऐकून उडालोच. हजाराहून अधिक पानांचा तो ठोकळा आहे. बावस्कर म्हणाले , ‘या पाठांतरामुळं माझे फाउंडेशन पक्कं झालंय.’ सेकंड एम्. बी. बी. एस्. च्या पॅथॉलॉजी परीक्षेत डॉ. के. डी. शर्मा नावाच्या परीक्षकांनी बावस्करांना ब्लडची स्लाईड दाखवली आणि विचारले, ‘ही पुरुषाच्या रक्ताची आहे की स्त्रीच्या रक्ताची ? गडबडलेच. पण मायक्रोस्कोपखाली ती लक्षपूर्वक पाहिली आणि सांगितले की ही स्त्रीची आहे. ते थक्कच झाले. विचारलं, कशावरून? बावस्करांनी एका पेशीच्या आत (स्त्रीचे क्रोमोसोम्स एक्स-एक्स असल्यामुळे दिसणारे) बार बॉडिज नावाचे अतिसूक्ष्म ठिपके दाखवले. डॉ. शर्मांनी सर्वांना बोलावून घेतलं आणि सांगितले, बघा हा अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचा मुलगा हे ओळखू शकलाय.” पुस्तक पाठ करायची. सर्व मनापासून शिकायचं. कष्टा कडे पाहायचे नाही; यामुळे त्यांना विषय पक्के माहीत होते.
या विंचू चावल्याच्या केसेसचे त्यांनी असेच अतिशय कष्ट व काळजीपूर्वक रेकॉर्ड ठेवले. आल्या आल्या ज्या १७ केसेस आल्या. त्यातल्या ५ मृत्यू पावल्या. त्यांची थोडक्यात काय लक्षणे होती. अशी माहिती हाफकिनच्या डॉ. गायतोंडेंना कळवली होती. त्यांनी थोडी भर घालून ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील जगप्रसिद्ध जर्नलसाठी पेपर पाठवला. तो गायतोंडे-जाधव- बावस्कर अशा नावाने १९७८ साली प्रसिद्ध झाला . ‘लॅन्सेट’ मधे ओळ छापून येणं परमभाग्याचं. तिथे साहित्य येतं. त्यातलं ९८ टक्के साहित्य संशोधनाच्या कसाला न उतरल्याने परत केलं जातं. तिथं याचे नावासहित अख्खे साडेतीन इंच लांबीचं पत्र छापून आले. तिथं बावस्करांना संशोधनाची चव कळली. वास्तविक पाहता डॉ. गायतोंड्यांसारख्या सिनियर माणसाने बावस्करांचे नाव पहिले टाकायला काही हरकत नव्हती. कारण मूळ काम बावस्करांनी केलेले होते.
तिथून पुढे मात्र त्यांनी संशोधन एकट्याच्या जिवावर आणि नावावर केलं. नंतर ८२ साली, ५१ पेशंटचे रेकॉर्ड समोर ठेवून त्यांनी दुसरा पेपर लिहिला. विंचवाच्या दंशामुळे काय काय आणि कसं कसं होत जातं याचा उलगडा करणारा तो लेख होता. तो स्वतंत्रपणे बावस्कर या नावाने ‘लॅन्सेट’ मध्ये छापून आला. तो अख्खं दीड पान होता. त्यात यांनी काढलेल्या पल्मनरी इडिमा झालेल्या फुप्फुसाचा एक्स-रेही छापला होता. सुरुवातीला चौदा ओळीत सर्व लेखाचा सारांश द्यावा लागतो, तसा दिलेला होता. चार टेबल्स देऊन वय, स्त्री – ष, त्यांची लक्षणं-चिन्हं, ज्या केसेस गेल्या त्यांचे तपशील असं व्यवस्थित दिलेलं होतं. शेवटी निरीक्षणं मांडल्यावर त्यांची चर्चा केलेली होती.
मधल्या काळात प्राझोसिनचा उपाय सापडल्यावर त्यांनी ८४ साली दाखल झालेल्या १२६ केसेसवर प्राझोसिन उपचारांचा सज्जड पुरावा दाखल केला. हा पेपर ‘लॅन्सेट’मधे मार्च ८६ मधे छापून आला. जवळपास पाऊण पानाचा हा पेपर होता. यावेळी त्यांच्या नावाखाली आणखी एक नाव होतं, ते त्यांच्या घरी नव्याने दाखल झालेल्या प्रमोदिनीताईंचे, पी. एच. बावस्कर असे. Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research
जागतिक पातळीवरच्या ‘टॉक्सिकॉलॉजी’च्या क्षेत्रात या पाऊण पानाने प्रचंड खळबळ उडवून दिली. इस्रायलच्या डॉ. एम. गुरियन या तज्ज्ञाचे लगेच पत्र आले. आम्ही तुमच्याशी संपूर्ण सहमत आहोत. आता यापुढे अटिव्हेनॉम द्यायच्या ऐवजी तुमची पद्धत (प्राझोसिन) वापरणार आहोत.
बावस्करांनी मला त्यांना आलेल्या पत्रांच्या फाइल्स दाखवल्या. परदेशातनं निरनिराळी विद्यापीठं, संशोधन संस्था, संशोधक यांनी ‘तुमच्या सर्व पेपर्सच्या प्रती पाठविण्याची’ विनंती करणारी शे-दोनशे तरी पत्रं होती. त्या कार्डपाकिटांवरचे स्टेप काढले तरी तिकिटांचा मोठा जागतिक संग्रह होईल. मी विचारले, “मग तुम्ही पाठवण्याचे काही चार्जेस घ्यायचे का?” “नो, नो, नो, नो, इटस् ऑनर. त्यांना तर पाठवायचोच. पण इथल्या सगळ्या मेडिकल कॉलेजेस, संस्था, संबंधित डॉक्टर्स सगळ्यांना मी प्रती पाठवल्या. त्यापायी आतापर्यंत माझा लाखभर तरी खर्च झाला असेल.
ती फाईल पाहताना भारतातून आलेले एकही पत्र दिसले नाही. त्याविषयी विचारले. बावस्कर म्हणाले, “हीच दुःखाची गोष्ट आहे. भारतातून मला अद्याप असं एकही पत्र आलेलं नाही. जगातल्या कानाकोपऱ्यातले लोक पेपर मागवतात, ट्रीटमेंटचा फायदा करून घेतात. तसं इथं लोकांना वाटतच नाही. भारतातील संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च अशी आय्. सी. एम्. आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) ही सरकारपुरस्कृत मोठी संस्था. त्यांना मी माझे पेपर्स स्वतःच पाठवले. म्हणजे त्यांच्याकडे कुणी विचारणा केली, तर ते पेपर उपलब्ध करून देतील. दोन वर्षांनी मी ८ ट म्हणून त्यांना पत्र लिहिलं ‘विंचू दंशावर काही साहित्य तुमच्याकडे आहे का ?’ त्यावर उत्तर बघा काय आलंय.” त्यांनी दाखवलेल्या आयु, सी. एम्. आर च्या उत्तरात लिहिलं होतं, की ‘आमच्याकडे या विषयावरचं साहित्य नाही.’ बावस्कर म्हणाले, ‘म्हणजे मी पाठवलेले माझे पेपर्स फेकूनच दिले असणार.’
बावस्करांचे जवळजवळ ३६ पेपर्स आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आले. पण त्यांनी आयु. सी. एम्. आर. च्या ए. सी. आय. या जर्नलसाठी पाठवलेला पेपर ‘इंग्लिश चांगले नाही’ या कारणासाठी नाकारला गेला. बावस्कर म्हणाले, “मी इंटरनॅशनल जर्नल्सकडे इतके लेख पाठवले, तर कुणी माझ्या इंग्लिशविषयी तक्रार केली नाही. ती माणसं फार वेगळी आहेत. ओरिजिनल रिसर्च असेल ना, तर दे जंप ऑन इट. इंग्लिश सुधारून घेतात. पण तसं करताना पोलाइटली ‘तुमची भाषा थोडी अॅडजस्ट केली तर चालेल ना,’ असं विचारतात, प्रूफ अॅप्रूव्हलसाठी पाठवतात.
लॅन्सेटच्या संपादकांचं पत्र होतं, ‘प्रतिकूल वातावरणात तुम्ही केलेल्या संशोधनाचं आमच्याकडे खूप कौतुक होत आहे.’ डी. ए. वॉरेल नावाचे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतले ट्रॉपिकल मेडिसीनचे प्रोफेसर आहेत. त्यांनी लिहिलेलं भलं मोठं टेक्स्ट बुक मला बावस्करांनी दाखवले. ते म्हणाले, “वॉरेल ही जागतिक कीर्तीची अॅथॉरिटी आहे. जगभर फिरून विशेषतः सर्पदंशावर त्याने विशेष काम केलं आहे. हे लोक उगाच पुढं येत नाहीत. आपल्यापेक्षा अनेक पटींनी ते काम करीत असतात.” हे वॉरेल बावस्करांच्या प्रेमातच पडले आहेत. त्यांचा बराच पत्रव्यवहार पाहिला. त्यांनी एका पत्रात लिहिलंय, ‘यू हॅव व्हच्च्युअली सॉल्व्हड द प्रॉब्लेम् ऑफ लाइफ थ्रेटनिंग स्कॉर्पियन एनुव्हेनॉमेशन’. ती टेक्स्टबुकची प्रत त्यांनी भेट पाठवली. एक त्यांचा विद्यार्थी इंग्लंडहून बावस्करांच्याकडे काही दिवस राहायला पाठवला. Story of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar’s research
या संशोधनाची अंगे-उपांगे घेऊन बावस्करांनी अनेक पेपर्स लिहिले. ब्रिटिश हार्ट जर्नल, अॅनल्स ऑफ ट्रॉपिकल पेडियाट्रिक्स, जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन अँड हायजिन, टॉक्सिकॉन… अशी अनेक.
भारतातल्या इंडियन हार्ट जर्नल, बाँबे हॉस्पिटल जर्नल, महाराष्ट्र मेडिकल जर्नलमध्ये त्यांचे लेख आले. इतर डॉक्टरांनी अॅट्रोपिन देऊन हार्ट फेल्युअरमधे गेलेल्या अनेक केसेस त्यांच्याकडे यायच्या. त्यांच्याशी प्राझोसिन दिलेल्या पेशंटची तुलना करून एक पेपर लिहिलाय. त्यातला एक पेपर मला गमतीदार वाटला. एखाद्याला विंचू चावला की तो ओरडतो, त्याला बघायला घरातलं दुसरं कुणीतरी येतं, आणि विंचू कुठे ते बघायला जातं, आणि त्या माणसाला तोच विंचू चावतो. दोघांनाही बावस्करांकडे आणलं जातं. आधीच्या माणसाला थेट हार्ट फेल्युअर, पल्मनरी इडिमापर्यंत दुखणं होतं. नंतरच्या माणसाला फक्त वेदना होतात आणि त्यातनं तो काही तासांनी बरा होतो, अशा त्यांना वीस की एकवीस जोड्या सापडल्या. आणि त्यांनी मांडलं की किती विष शरीरात जातं, यावर पुढचे परिणाम अवलंबून असतात. पहिल्या दंशात बहुतेक विष आधीच्या माणसांच्या अंगात गेलेलं असतात, म्हणून परिणाम खूप होतो.
लहान मुलांवर सर्वात वाईट परिणाम होतात आणि या सगळ्यात वृद्ध फारसे दिसत नाहीत. यावर बावस्करांचे म्हणणे की वृद्धांमध्ये अॅड्रेनल ग्लँडचं सिक्रिशन संपलेलं असतं. म्हणून विंचू चावला तरी अॅड्रेनलच रक्तात ओतलं न गेल्याने परिणाम काही होत नाहीत. दंशाच्या जागी वेदना होतील तेवढ्?
या डॉक्टरांना पद्मश्री पुरस्कार पूर्वीच द्यायला हवा होता. जगात इत्तरत्र विंचूदंशावर प्रभावी औषध नसताना केवळ विंचूदंशानंतरच्या शरीरशास्त्राच्या अंतर्गत परिणामाच्या अनुमानावरून भारतात सहज उपलब्ध असलेले औषधच लागू पडले व जगातल्या संशोधकांनी तोंडात बोटे घातली.
जेनु काम तेने थाय, बिजा करे तो गोता खाय !