कुडलीतील संजयची कथा; नॅबच्या आधाराने गिरणी आणि दुकान
गुहागर, ता. 14 : वयाच्या आठव्या वर्षी एका शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेला कुडलीतील संजय माटल आज स्वत:च्या पायावर उभा आहे. आईवडिल, २ भाऊ, १ वहिनी यांच्या आधारावर संजयचा संसार सुरु झालाय. अंध पत्नीची साथ आणि दुकान सुरु करण्यासाठी नॅबने दिलेले अर्थसाह्य या बळावर आता तो अर्थाजर्न करतोय. उभयतांनी आपल्या डोळस मुलीचा पहिला वाढदिवस स्वकमाईच्या आठ हजार रुपयातून साजरा केला.
तीसरीपर्यंत हुशार विद्यार्थी म्हणून कौतुक होणाऱ्या संजयच्या डोक्यात एक ट्युमर होता. हा ट्युमर काढल्यानंतर हळुहळु संजयची दृष्टी गेली. शाळा संपली. बालपण हरवलं. आता आपलं आयुष्य संपलं. निराशेच्या गर्तेत तो सापडला होता. आई वडिलांच्या चेहऱ्यावरील हसु जावून संजयच काय होणार ही चिंता होती.
2011-12 च्या दरम्यान गुहागरमधील नेत्रचिकित्सक दिनेश जोशी संजयच्या घरी गेले. नॅबची माहिती दिली. काही करण्याची उर्मी असेल, नव्याने सुरवात करायची असेल तर माझ्याबरोबर चिपळूणला चल. असे सांगितले. पण खेडेगावात रहाणाऱ्या संजयच्या आईने चिपळूण पाहिलेच नव्हते. मुलाच्या काळजीने आईच्या काळजात धस्स झालं. अनोळखी माणसासोबत आपल्या अंध मुलाला पाठवल्यावर काही झालं तर…
अखेर आई आणि संजय नॅबपर्यंत पोचले. अंधत्व स्विकारुन संजयने स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी नॅबची धडपड सुरु झाली. मुंबईतही प्रशिक्षण झाले. गमावलेला आत्मविश्र्वास संजयने परत मिळवला. घरी येवून नॅबच्या मदतीने चॉकलेट, गोळ्या बिस्कीटे, यांचे दुकान सुरु केले. सुरवातीला संपूर्ण मालासह भांडवली खर्च म्हणून रोख रुपये नॅबने दिले.
मुंबईत प्रशिक्षणाच्या निमित्ताने संजयची ओळख तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीबरोबर झाली. ही अंध मुलगी गुजराथी गरीब घराण्यातील होती. दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोन्ही घरच्याही या प्रेमाला संमती देत लग्न लावून दिले. संजयने संसारही थाटला. आज घराशेजारी गोळ्या बिस्कीटांचे दुकान आणि घरगंटीवर दळण दुळून देण्याचा व्यवसायही संजय आणि संजयची पत्नी सांभाळत आहेत. कुडली माटलवाडीतील ग्रामस्थ प्रामाणिकपणे संतोषच्या व्यवसायाला हातभार लावत आहेत. गावी रहाणारी आई डोळसपणे यांचा फुलणारा संसार पाहून समाधानी आहे.

