गुहागर व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गुहागर : एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी इंडियन ऑइल सोबत करार केला असून या कराराद्वारे राज्यातील ३० आगारांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. गुहागर आगार मध्येही पेट्रोल-डिझेल विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन गुहागर व्यापारी संघटना व शहरातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यासाठी तहसीलदार लता धोत्रे यांच्याकडे देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर तालुकास्थान आहे. जिल्ह्यातील अन्य तालुकास्थानांचा विचार केला तर गुहागर सोडून मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या प्रत्येक तालुका ठिकाणी पेट्रोल पंप आहे. गुहागर तालुका स्थानापासून दहा किमी अंतरावर शृंगारतळी येथे पेट्रोल पंप आहे.
आज पर्यटन स्थळ म्हणून गुहागरची ओळख आहे. त्यामुळे विविध कामांसाठी गुहागरमध्ये येणाऱ्या तालुकावासीयांची संख्या मोठी आहे. सप्टेंबर ते मे या कालावधीमध्ये प्रत्येक शनिवार, रविवारी गुहागर शहर पर्यटकांनी फुलून जाते. याशिवाय असगोली, आरेगाव, रानवी, पालशेत, वरवेली आधी गावांना गुहागर हे शहर नजीकचे आहे. या मुद्द्यांचा विचार केला तर गुहागर आगारातील पेट्रोल पंप आगारचा नफा वाढवेल. सोबत गुहागरच्या विकासाला मोठा हातभार लागेल. येथे येणाऱ्या पर्यटकांना इंधन कुठे भरावे याची चिंता लागून राहणार नाही. व्यापारी, दुकानदार, छोटे टेम्पोचालक, मच्छिमार आणि मुद्दाम इंधन भरण्यासाठी शृंगारतळी येथे जावे लागते त्यांचा पैसा वाचेल. त्यामुळे गुहागर आगारातील पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप सुविधा निर्माण व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी व्यापार संघटनेचे अध्यक्ष नरेश पवार, सुधीर कदम, सागर लाड, हेमंत बारटक्के, मनोज बारटक्के आदींनी तहसीलदार धोत्रे यांना निवेदन दिले.