चाकरमानी कामधंद्यासाठी परतल्याने मजुरांचा अभाव
गुहागर : तालुक्यात अनेक ठिकाणी हळवी भातशेती तयार झाल्याने कापणीला सुरुवात करण्यात आली आहे.परंतु, ऐन कापणीच्यावेळी चाकरमानी कामधंद्यावर परतल्याने भात कापणी व झोडणीला माणसाची कमतरता भासू लागली आहे. त्यातच अधून मधून संध्याकाळी पावसाचा शिडकाव होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसत आहे.
गेले काही वर्षे शेतात कामाला माणसे नसल्यामुळे भातशेती मोठ्या प्रमाणात कोणी करत नसे. त्यामुळे जमिनीच ओसाड पडलेली दिसत होती. तालुक्यातील अनेक गावात वाडीवस्थीमध्ये कामाला माणसे नसल्यामुळे एकमेकांच्या शेतात कामाला जायची जणू काही प्रथाच पडलेली आहे. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ७० ते ८० टक्के चाकरमानी मुंबई, मुंबई उपनगरे, पुणे येथून आपल्या गावात मार्च महिन्यातच आली होती. पुढे भात पेरणी व लावणीच्या कामातही चाकरमान्यांनी मदत केल्याने यावर्षी सर्वाधिक क्षेत्र भात लागवडीखाली आल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. १५ जुलैच्या आत तालुक्यातील लावण्याची कामे पूर्ण झाली होती.
या भात लावणी व भाजवलीसाठी चाकरमानी गावात होते, म्हणून बाहेरच्या लोकांची मदत लागली नव्हती. मात्र आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने ६० टक्के चाकरमानी ऐन भात कापणीच्या वेळीच आपापल्या कामधंद्यावर परतल्याने स्थानिक शेतकऱ्यांवर कापणीसाठी माणसे शोधायची वेळ आली आहे. तालुक्यात हलवी भात शेती तयार झाली असून कापणी, बाधणी व झोडणीला सुरवात झाली आहे. पीक सध्या समाधानकारक दिसत आहे. परंतु, तयार झालेला भात रानगवे, रान डुकराचा त्रास, पावसाचे सावट, माणसाची कमतरता यामुळे शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत असून सकाळपासुन रात्री ऊशीरापर्यंत भात कापणी व झोडणीचे काम सुरू आहे.