गुहागर शहरातील कोरोनाग्रस्तांना घरपोच मदतीचे वाटप
गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मधील सन १९९२ /९३ सालातील विद्यार्थ्यांनी सध्याच्या वाढत्या करून प्रादुर्भावामध्ये शहरातील कोरोना बधितांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत या रुग्णांना घरपोच कोरोना किटचे वाटप केले जात आहे. माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सध्या गुहागर तालुक्यात विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहेत. असे असले तरी या सामाजिक उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मधील सन ९२/९३ शाळातील विद्यार्थ्यांनी शहरातील कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संकल्प केला. त्याप्रमाणे या बॅचमधील विद्यार्थ्यांनी ज्याला ज्याला शक्य होईल अशाप्रकारे वर्गणी जमा केली. आपण करत असलेल्या मदती विषयी त्यांनी शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली. त्यांनी या चांगल्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्याप्रमाणे शहरातील कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना वाफ घेण्याची मशीन, विटामिन सी, विटामिन बी अशा गोळ्या असे सुमारे ३०० रुपये किंमतीचे कीट मोफत प्रत्येक रुग्णाला घरपोच करत आहेत. तसेच त्यांनी आहार कोणता घ्यायचा याचे मार्गदर्शन करून काळजी घेण्याचे प्रसिद्धी पत्रकहि दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात १०० किट आणली असून दररोज रुग्णांना वाटप करण्यात येत आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभत आहे.