गुहागर : तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, युवा मंडळ आयोजित गड किल्ले महाराष्ट्राचे स्पर्धेत शुभम राऊत याने साकारलेल्या लोहगड या किल्ल्याने प्रथम क्रमांक पटकावला.
गुहागर शिवाजी चौक येथील कै.कु. हेमंत बाईत यांच्या स्मरणार्थ खुल्या गटातील किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये ११ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांनी इंटरनेटचा वापर करून किल्ल्यांवरील प्रसिद्ध इमारती, बुरुजांची संख्या, किल्ल्याचा इतिहास अशी सर्व माहिती गोळा करून किल्ले बनवले होते. साकारलेला गड- किल्ल्यांच्या माध्यमातून स्पर्धकांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये शुभम लक्ष्मण राऊत याने साकारलेल्या लोहगड प्रतिकृतीला प्रथम क्रमांक, साहिल संजय घाडे यांनी साकारलेल्या सुवर्णदुर्ग द्वितीय क्रमांक, अथर्व प्रकाश रहाटे याने साकारलेल्या कोंढाणा किल्ल्याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे गौरी बेंडल, प्रेरणा बेंडल, अंकिता फिलसे, अनिकेत झिंबर यांनी परीक्षण केले. यावेळी संकेत वरंडे, निखील बेंडल, सर्वेश फिलसे, पंकज घाडे व अन्य उपस्थित होते.