गुहागर, ता. 29 : संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल शैलेश अरूण कांबळे ( मुळगाव रानवी) याला आर्ट बिटस् फाउंडेशन पुणे या संस्थेतर्फे युवा कला गौरव पुरस्कार – 2021 नुकताच ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे शैलेश कांबळेच्या रुपाने रानवी गावाचा सन्मान झाला आहे. Shailesh honored by Yuva Kala Guarav Award 2021
प्रवास शैलेशच्या जिद्दीचा
गुहागर तालुक्यातील रानवीतील शैलेश कांबळेने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, रानवी तर माध्यमिक शिक्षण श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, गुहागर तसेच, दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय, अंजनवेल मधुन पूर्ण केले. अकरावी बारावी खरे ढेरे महाविद्यालय, गुहागर येथे केल्यानंतर डीबीजे महाविद्यालयात चिपळूण येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
लहानपणापासून त्याला संगीताची आवड होती. रानवीला आपल्या मामाकडे असताना आजोबा गोपाळ बारगोडे आणि मामा विकास बारगोडे यांच्याकडे तो ढोलकी वाजवायल शिकला. हळुहळु गावातील भजनांमध्ये, आरतीला तो ढोलकी, टाळ, डफ वाजू लागला. भजनेही सांगू लागला. ढोलकीबरोबर तबला, पखवाज ही वाद्ये ही तो शिकला. वादनातील कौशल्यामुळे शैलेशचे कौतूक होवू लागले. त्यातूनच आपण संगीत क्षेत्रातच कारकिर्द घडवायची असे स्वप्न उराशी घेवून शैलेश मुंबईला गेला.
संगीताचे धडे घेण्यासाठी मुंबईत त्याने कोर्स केला. स्वप्न मोठं होतं पण रस्ता सापडत नव्हता. नातेवाईकांकहे रहायचे. पोटापाण्यासाठी नोकरी करायची आणि संधी मिळेल तिथे वादन करायचे. असा प्रवास सुरु असतानाच एका कार्यक्रमात शैलेशची ओळख गीतकार प्रभाकर पांचाळ यांचा पुतण्या संकेतशी झाली. ओळखीचे रुपांतर दोस्तीत झाले आणि शैलेशला संधी मिळत गेल्या.
अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट गायकांसोबत शैलेश यांनी विविध प्रकारची वाद्ये वाजवून साथसंगत केली आहे. काही चित्रपटाना संगीत देणाऱ्या वाद्यवृंदामध्ये सहभागी होण्याची संधीही त्याला मिळाली. रिॲलिटी शो, म्युझिक अल्बम, स्टुडिओ रेकॉर्डिंग, म्युझिक चॅनेल अशा विविध माध्यमांमध्ये विविध ताल वाद्यांचे वादन त्यांने केले आहे.
या कामांची, शैलेशच्या जिद्दीची दखल आर्ट बिटस् फाऊंडेशनने घेतली. डिसेंबर 2021 मध्ये आर्ट बिटस् फाऊंडेशनने संगीत विभागातील महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी 7 सप्टेंबर 2021 ला शैलेश कांबळेची निवड केली. डिसेंबर 2021 मध्ये ऑनलाइन पध्दतीने या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. Shailesh honored by Yuva Kala Guarav Award 2021
कलाकारांचा सन्मान करणारे आर्ट बिटस् फाऊंडेशन, पुणे
आर्ट बिटस् (Art Beats Foundation) ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य, नाट्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.
आर्ट बिटस् फाऊंडेशनचे संतोष पांचाळ म्हणाले की, यावर्षी 6000 कलाकारांची माहिती संकलीत केली होती. त्यापैकी 600 कलाकारांना नामांकन दिले. या कलाकारांचे व्हिडिओ आणि अन्य माहिती प्रत्येक विभागातील निवड समितीकडे पाठवली. त्यातून प्रत्येक विभागात 50 कलाकारांची निवड पुरस्कारासाठी केली आहे. Shailesh honored by Yuva Kala Guarav Award 2021