उपनिरिक्षक दिपक कदम : कोकणातही घडत आहेत असे गुन्हे
गुहागर, ता. 19 : कोकणातील काही तरुण लैंगिक आमिषाला (Sextortion in Konkan) बळी पडून फसवणुकीची शिकार बनत आहेत. एका विचित्र चुकीमुळे या तरुणांना आपण ही गोष्ट कोणाला सांगावी असा प्रश्र्न पडलाय. अशी शिकार झालेल्या तरुणांनी मानसिक दडपणाखाली न येता आपल्या जवळच्या मित्राला सोबत घेवून सायबर क्राईम शाखेच्या पोलीसांपर्यंत पोचावे. तेथील अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील. असे आवाहन सायबर सेलचे नोडल अधिकारी गुहागरचे पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम यांनी केले आहे.
गुहागर तालुक्यातील एक तरुण लैंगिक आमिषाला ( Sextortion in Konkan ) बळी पडला. त्यानंतर त्या तरुणाकडे पैशांची मागणी होवू लागली. काही हजार रुपये दिल्यानंतर अल्प कालावधीत त्याचे बँक खाते रिकामे झाले. तेव्हा आपण फसवले जात आहोत याची त्या तरुणाला जाणिव झाली. हा तरुण गुहागरमधील सायबर सेलचे नोडल अधिकारी (Nodal Officer of Cyber Crime) दिपक कदम यांच्यापर्यंत पोचला. त्याच्यासोबत घडलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्याने दिली. त्यामुळे गुन्ह्याचा प्रकार लक्षात आला. दिपक कदम यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केले.
कसा घडतो गुन्हा (सत्य घटना) Sextortion in Konkan
आजकाल अनेक तरुण मुले फेसबुकवर टाईमपास करत असतात. अशा मुलांना एका अनोळखी मुलीकडून (?) Friend Request येते. स्वाभाविकपणे अशी Friend Request आल्यावर तरुण सदर मुलीची Profile पहातात. त्याठिकाणी त्या मुलीचे अनेक उत्तेजक फोटो असतात. हे फोटो पाहिल्यानंतर तो तरुण त्या मुलीची Friend Request स्विकारतो. chatting ला सुरवात होते. बहुतांशी वेळी हे chatting इंग्रजी किंवा हिंदीमध्ये असते. काही दिवसांमध्ये फेसबुक मैत्रीणी जवळीक वाढवते. मग मैत्रीणी त्या तरुणाकडे whats app Number ची मागणी करते. आता व्हॉटसॲप ॲपवर व्यक्तिगत गप्पा सुरु होतात. साधारणपणे हा तरुण आपल्या जाळ्यात अडकला आहे. असे लक्षात आले की ती मुलगी स्वत:चे काही तोकड्या कपड्यातील फोटो पाठवू लागते. मग कपडे नसलेले फोटो पाठवून त्या तरुणाकडेही नग्नावस्थेतील फोटो, व्हिडिओंची मागणी होते. इथे तरुण फसतो. आपला स्वत:चा नग्नावस्थेतील व्हिडिओ करतो.
तरुणांचे असे व्हिडिओ सदर तरुणी स्क्रीन रेकॉर्डद्वारे चित्रीत केले जातात. आणि त्याच व्हिडिओंचा आधार घेवून मुलगी सदर तरुणावर विनयभंगाचे आरोप करते. पैशाची मागणी सुरु होते. मागणीबरहुकुम पैसे मिळाले नाहीतर तर पोलीसांत जाण्याची धमकी दिली जाते.
तुम्ही फोनवरुन पैसे पाठवलेत तर पुढच्या काही तासांत तुमचे बँक खाते रिकामे केले जाते.
तुमच्या सर्व पळवाटा त्या मुलीला ठावूक असतात. विशेष म्हणजे तिने तुम्हाला पाठवलेले व्हिडिओ तिचे स्वत:चे कधीच नसतात. आणि तरुण मुले मात्र Risk नको म्हणून whatsapp वरील तिने पाठवीले सर्व व्हिडिओ डिलिट करतो.
असे गुन्हे देशातील अनेक तरुणांच्या बाबतीत घडत आहेत. काही तरुणांनी ब्लॅकमेलींगला कंटाळून आत्महत्याही केल्या आहेत. तेव्हा सामाजिक माध्यमांवर मैत्री करताना सावध रहा. आमिषाला बळी पडले असाल तर प्रतिष्ठेच्या (इज्जत) खोट्या कल्पना दूर सारुन पोलीस ठाण्यातील सायबर क्राईम सेलला त्वरीत भेटा. पोलीसांना घडलेली प्रत्येक गोष्ट कोणताही आडपडदा न ठेवता सांगा. पोलीस तुम्हाला योग्य मार्ग दाखवून आपल्यावरील संकट दूर करतील. असे आवाहन सायबर क्राईम सेलचे नोडल अधिकारी दिपक कदम यांनी केले आहे.