गुहागर : देशामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल वाढीविरोधात गुहागर तालुका शिवसेनेच्यावतीने गुहागर तहसिल कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार लता धोत्रे यांना देण्यात आले.
देशामध्ये २०२० हे वर्षे कोरोना पार्श्वभूमीवर अनेक समस्यांना सामना करण्यात गेले. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तरीही केंद्र सरकार सातत्याने सर्वसामान्यांचा विचार न करता डिझेल व पेट्रोलची वाढ करीत आहे. २०१४ मध्ये ३.४६ प्रती लिटर असलेली एक्साईज ड्युटी, २०२१ मध्ये प्रतिलिटर २१.८३ रुपये झाली. तसेच पेट्रोल व डिझेलवरील वँट २० टक्क्यांवरुन ३० टक्के करण्यात आला. सदरचे कर त्वरीत मागे घेण्यात यावेत, तसेच या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून महागाईचा कहर झाला आहे.
घरगुती सिलेंडरचे दरही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भविष्यात जनतेला लाकूडफाटा हाच पर्याय शिल्लक राहिल. परिणामी, प्रदूषण वाढून पर्यावरणाचा ऱ्हास होईल. नैसर्गिक संपदा नष्ट होईल. यास केंद्र सरकार जबाबदार राहिल, असे या निवेदनात म्हटले आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या आदेशाने तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात जिल्हा उपाध्यक्ष महेश नाटेकर, पंचायत समिती सदस्या पूर्वी निमूणकर, रविंद्र आंबेकर, युवा सेना तालुकाध्यक्ष अमरदीप परचुरे, उपतालुकाप्रमुख स्वप्नील भोसले, नारायण गुरव, दीपक कनगुटकर, राकेश साखरकर, सूरज सुर्वे, पिंट्या संसारे, सुमती जाधव, सचिन जाधव सहभागी झाले होते.