आफ्रोहचे राज्यकार्यकारिणी सदस्य चंद्रभान सोनुने यांचा शासनाला इशारा
बुलडाणा : महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०१९ च्या शासनाने घेतलेल्या निर्णयाला वर्ष होत आले तरीही या शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ नुसार बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅकेच्या १३ कर्मचा-यांना अधिसंख्य पदाच्या नेमणूकीचे आदेश न दिल्याने व न्याय मिळत नसल्याने आज दि.१० डिसेंबर २०२० रोजी ‘मानवी हक्क दिनी’ मंत्रालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा आफ्रोह या कर्मचारी संघटनेचे बुलडाणा जिल्हा सचिव व राज्य कार्यकारीणी सदस्य चंद्रभान सोनुने यांनी राज्य शासनाला दिला आहे.
याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी पाठविण्यात आले असून मा. मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, सहकार व पणन मंत्री श्री.बाळासाहेब पाटील, पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, गृहराज्यमंत्री श्री.सतेज पाटील, प्रधान सचिव, सहकार व पणन यांच्यासह जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक व अध्यक्ष जिल्हा बॅक प्राधिकृत समिती बुलडाणा यांनाही या निवेदनाच्या प्रती सादर केल्या आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी २१ डिसेंबर २०१९ चा शासन निर्णय काढण्यात आला. याच शासन निर्णयाची अंमलबजावणी करून मंत्रालयापासून तर जिल्हास्तरावरील सर्वच कार्यालयातील कर्मचा-यांना तात्पुरत्या स्वरूपातील अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. मात्र याच शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ नुसार बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅकेतील यापूर्वी सेवासमाप्त करण्यात आलेल्या १३ कर्मचाऱ्याना वर्ष होत आले तरीही बॅकेचे प्रशासन व सहकार विभागाचे अधिकारी अधिसंख्य पदावर नेमणूकीचे आदेश देण्याबाबत टाळाटाळ व कुचराई करीत आहेत. या अन्यायाविरूद्ध चंद्रभान सोनुने यांनी यापूर्वी एकदा आत्मदहनाचा इशारा तसेच ५ दिवसाचे आमरण उपोषण केले होते. मात्र बुलडाणा बॅकेतील सहकार खात्याला जाग आली नाही. ‘मानवतेच्या दृष्टीकोनातून’ घेतलेल्या निर्णयानुसार या १३ कर्मचा-यांना न्याय मिळू शकला नाही. शेवटी या अन्यायाच्या निषेधार्थ व या १३ कर्मचा-यांच्या मानवी हक्काचे हनन होत असल्यामुळे त्यांच्या वतीने आफ्रोचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सचिव बुलडाणा जिल्हा चंद्रभान सोनुने यांनी ‘मानवी हक्क दिनी’च मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.