साडेसहा हजार शाखांमधून डिजिटल सातबाराचे वितरण
पुणे : पीककर्ज वितरित करण्यामध्ये सुलभता येण्यासाठी महसूल विभागाने बँकांसाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाची सेवा मिळण्यासाठी आतापर्यंत ५२ बँकांनी महसूल विभागासोबत सामंजस्य करार केल्यामुळे या बँकांमधून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत सहा लाख ९० हजार अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व बँका, सरकारी कार्यालयांमध्ये डिजिटल सातबारा थेट यंत्रणांना प्राप्त होण्यासाठी करार करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील ३६ विविध प्रकारच्या बँकांनी महसूल विभागाशी करार के ले आहेत. त्यामुळे या बँकांच्या शाखांमध्ये व्यवहार करताना सातबारा उताऱ्याची प्रत घेऊन जाण्याची गरज नाही. परिणामी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, सरकारी कामकाज, कर्ज प्रकरणे यांसाठी सातबारा उतारा, खाते उतारा यांच्या प्रती घेऊन जाण्याची गरज उरलेली नाही.
दरम्यान, बँका, वित्तीय संस्थांनी महसूल विभागाशी करार के ल्यानंतर त्यांना https://g2b.mahabhumi.gov.in/banking.application/ हा दुवा उपलब्ध करून देण्यात येतो. या दुव्यावर जाऊन संबंधित व्यक्तीशी निगडित उतारे डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून कर्ज प्रकरण, शासकीय योजनांचे लाभ नाकारण्याचे प्रमाणही कमी होत आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.
५२ बँकांचे महसूल विभागासोबत करार
महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पंजाब व सिंध बँक, जनता सहकारी बँक सातारा, सिडको-महाराष्ट्र, शिवदौलत सहकारी बँक पाटण, पी. डी. पाटील सहकारी बँक कराड, संगमनेर र्मचट सहकारी बँक, वारणा सहकारी बँक, सुवर्णयुग सहकारी बँक, वारणा सहकारी बँक, महाऊर्जा, ओरिएन्टल इन्शुरन्स कं पनी, माणदेशी महिला सहकारी बँक माण सातारा, प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक जालना, विश्वास सहकारी बँक नाशिक, हुतात्मा सहकारी बँक वाळवा, कर्नल आर. डी. निकम सैनिक स. बँक सातारा, जनता अर्बन स. बँक वाई, व्यंकटेश मल्टिस्टेट को. ऑप क्रे डिट सोसायटी नगर, सोपानकाका स. बँक सासवड, विश्वेश्वर स. बँक पुणे, कोल्हापूर अर्बन स. बँक, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खासगी बँकांमध्ये कोटक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये कोल्हापूर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, नगर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, लातूर, धुळे-नंदुरबार, बुलढाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर आणि नाशिक या बँकांनी महसूल विभागाबरोबर करार केला आहे.