गुहागर : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या प्रारंभ स्थानापासून श्रृंगारतळी पर्यंतच्या रखडलेल्या मोजणीला तीन वर्षांनी मुहूर्त सापडला. गेले दोन दिवस गुहागर शहरातील बाजारपेठ नाका (0 कि.मी.) ते मोडकाआगर अशी संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पडली. मात्र येथील अनेक जमिनमालकांना या संर्दभात नोटीसाच पाठवण्यात आल्या नव्हत्या.
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे कामापैकी चिखली ते मार्गताम्हाने हे काम संबधित ठेकेदाराने फेब्रुवारी अखेर हाती घेतले. 24 मार्च ते 30 एप्रिल लॉकडाऊनमुळे काम बंद होते. तरीही जून महिन्यापर्यंत हा रस्ता (सुमारे 12 कि.मी.) बऱ्यापैकी पूर्ण झाला. परंतू महामार्ग मंजूर होवून कामाची मुदत संपत आली तरी गुहागर पासून शृंगारतळी पर्यंतच्या रस्त्याची मोजणीच पूर्ण झालेली नाही. अखेर 23 सप्टेंबर 2020 ला मोजणीचा शुभारंभ झाला. ही मोजणी संयुक्तरित्या म्हणजे महसुल, बांधकाम, भूमि अभिलेख, कृषि, राष्ट्रीय महामार्ग या विभागांचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे रेखांकन करणारी खासगी संस्था या सर्वांच्या उपस्थितीत सुरु झाली. प्रत्यक्षात अनेक विभागांनी या मोजणीकडे पाठ फिरवली. सदर मोजणीची कल्पना देखील अनेक जमीन मालकांना नव्हती. कारण राष्ट्रीय महामार्गाने तब्बल 280 जागा मालकांना संयुक्त मोजणीला उपस्थित रहाण्याच्या नोटीसा पाठवल्या होता.
प्रत्यक्षात शहरातील केवळ 25 जमीन मालकांनाच नोटीसा मिळाल्याचे समोर आले आहे. त्यातही 23 सप्टेंबरला मोजणी आहे अशा नोटीसा देखील मंगळवारी (ता. 22 सप्टेंबरला) सायंकाळी मिळाल्याचे संबंधित जागा मालकांनी सांगितले.
शहरी भागात (बाजारपेठ नाका ते खरे ढेरे कॉलेजकडे जाणारा रस्तापर्यंत) केवळ 18 मीटर जागा महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. त्यात 11 मीटरचा रस्ता व उर्वरित जागेत साईडपट्टी आणि गटार अशी योजना आहे. असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने कनिष्ठ अभियंता समाधान हिमपरकर यांनी सांगितले. यावेळी भूमीअभिलेखचे भूमापक प्रशांत शिवलकर, डीपीआर कन्स्ट्रक्शनचे आंबुलकर व मदतनीस हे मोजणीच्या वेळी उपस्थित होते.