प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी याचे पाणी आरजीपीपीएल कंपनीकडून सोडण्यात आलेले प्रदूषित पाणी झिरपल्यामुळे येथील जलस्त्रोत प्रदूषित आणि क्षारयुक्त झाले होते. याबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली होती. दरम्यान, याबाबत तब्बल पंधरा दिवस उलटून गेले असून कंपनी प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर अद्याप ब्राह्मणवाडी ग्रामस्थांना दिलेले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत ग्रामस्थानी माहिती घेतली असता प्रदूषित पाण्याचे अहवाल अद्याप वेबसाईटवर टाकण्यात आलेले नाहीत. परंतु चिपळूण येथील अधिकाऱ्यांना पाणी हवालाबाबत ग्रामस्थांनी फोनवर विचारणा केली असता ब्राह्मणवाडी येथील दिपक वैद्य यांचा एक झरा प्रदूषित असून त्याच भागातील अन्य झरे आणि विहिरी मधील पाणी पिण्यास योग्य असल्याचे सांगितले. येथील सगळे जलस्रोत क्षारयुक्त, मचूळ झाले असताना कंपनी व्यवस्थापनाने अंजनवेल ग्रामपंचायतीला पाण्याचे स्रोत प्रदूषित नाहीत असे अजब पत्र कसे काय दिले, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
क्षारयुक्त प्रदूषित पाण्याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दि.३ एप्रिल २०२१ रोजी ब्राह्मणवाडी येथील दोन झरे आणि एका विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यानंतर पुन्हा दि.५ एप्रिल २०२१ रोजी आरजीपीपीएल प्रशासनाचा अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण येथील अधिकारी एकत्र येऊन ब्राह्मणवाडीतील झरे आणि विहिरी येथील पाणी नमुने तपासणीसाठी घेऊन गेले होते. यापैकी कोणत्याही पाणी नामुन्यांचे लेखी अहवाल अद्याप मागणी करून देखील ग्रामस्थाना प्राप्त झालेले नाहीत. परंतु नेलेल्या नामुन्यापैकी दोन झऱ्यांचे पाणी पूर्णतः प्रदूषित असून ते पिण्यास अयोग्य असल्याचे ते पाणी पाहिल्यावर, चव घेतल्यावर कुणीही सांगेल. परंतु हे पाणी नमुने पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्राद्वारे कंपनीला कसा काय दिला? की यासाठी कंपनीने त्यांच्यावर दबाव आणून आर्थिक साटलोट केलं आहे का ?अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. एन्रॉनचा दाभोळ वीज प्रकल्प असताना १९९९ साली झालेल्या द्रवरूप नाफ्ता प्रदूषणाची दाहक पार्श्वभूमी पाहता कंपनी मधून अशा प्रकारे प्रदूषित पाणी झिरपत राहिल्यास अंजनवेल मधील ब्राह्मणवाडी, बौद्धवाडी, आरमारकरि मोहल्ला, सालवाडी, बाजारपेठ, म्हातारखाडी, सुतारवाडी इतक्या मोठ्या राहत्या वस्तीचे नैसर्गिक झरे, विहिरी, तळे हे पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब कंपनी प्रशासनाला लेखी व तोंडी वारंवार लक्षात आणून देऊन सुद्धा ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाणी नमुने नेण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घेऊन ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थानी अंजनवेल सरपंच यांची देखील भेट घेतली. यावेळी त्यांनी देखील पाणी प्रदूषण हा विषय फार जुना, गंभीर असून आम्हाला पाणी नमुने तपासणीचा अधिकृत लेखी अहवाल द्यावा अशी मागणी केली. आणि त्याचवेळी अंजनवेल ग्रामपंचायतीने आरजीपीपीएल प्रशासनाला अंजनवेलच्या पाणी प्रदूषणाविषयी तातडीने लक्ष घालून ब्राह्मणवाडी येथील प्रदूषित घरांना पाणी पुरवठा सुरु करावा याबाबत केलेल्या मागणी पात्राची सत्यप्रत माहितीसाठी प्रत्यक्ष हाती दिली. परंतु कंपनीने पाणी प्रदूषण रोखण्यासाठी आणि पाणी पूरवठा करण्याबाबत कोणतीही कार्यवाही आजपर्यंत केलेली नाही.
दरम्याम अंजनवेल, वेलदुर, रानवी या तीन प्रकल्पग्रस्त गावांच्या डोंगरमाथ्यावरून पावसाळ्यानंतर वाहणारे गोडे पाणी कंपनी प्रशासनाकडून बंधारे घालून गेली अनेक वर्षे अडवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पंपाद्वारे हे पाणी जुन्या नाफ्ता टॅन्क मध्ये मोठ्या प्रमाणात भरून ठेवण्यात येत आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये एमआयडीसीने संपादन केलेल्या जागेमध्ये अनधिकृत अशा अनेक बोअरवेल देखील मारल्या आहेत. या सगळ्याचा परीणाम म्हणून येथील तीन गावांमधील पाण्याची नैसर्गिक पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. साहजिकच गावामधील शेततळे, वनराई बंधारे, तलाव, साठवण विहिरी पाण्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस आटत चालल्या आहेत. हि गंभीर बाब ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी लक्षात आणून दिली असून याबाबत कंपनीने लेखी उत्तर द्यावे अशी मागणी होत आहे.
ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थानी सांगितले की, पूर्वीचा एनरॉन वीज प्रकल्प किंवा आत्ताचा आरजीपीपीएल प्रकल्प असेल. गेल्या २५ वर्षात आम्ही कधीही व्यक्तिगत नोकऱ्या, ठेका मागायला किंवा अन्य कुठलीही दादागिरी करायला कंपनीकडे गेलेलो नाही. आणि जाणार देखील नाही. परंतु फेब्रुवारी २०२१ पासून पाणी प्रदूषित झाल्यानंतर आम्ही सनदशीर मार्गाने पाणी पुरवठा करावा आणि आपले प्रदूषित पाणी बंद करावे अशी मागणी करीत आहोत. गेल्या दोन महिन्यात काही राजकीय पक्ष आणि संघटना यांचे आम्हाला पाठिंब्याचे फोन आले असून पाणी प्रदूषण विषयात कंपनी विरोधात आंदोलन उभे करू अशी अनेकांनी भूमिका मांडली आहे. परंतु आम्ही आतापर्यंत तरी संयमित मार्गाने याबाबत भूमिका घेतली आहे. दरम्यान, सद्या उन्हाळी हंगामामुळे ग्रामपंचायत अंजनवेल यांची पाणी पुरवठ्याची विहीर आणि वर उल्लेख केलेल्या आठ वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत यांचे कंपनीमुळे प्रदूषणाचे भयाण व उग्र रूप पुढे आले तर अंजनवेल गाव ऐन उन्हाळ्यात पूर्ण तहानलेला राहण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. याला सर्वस्वी जबाबदार आरजीपीपीएल प्रशासन असणार आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.