प्रदूषित पाण्याचे नमुने घेतले तपासणीसाठी
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी क्षारयुक्त प्रदूषित पाण्याबाबत आरजीपीपीएल प्रशासनाकडे त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्यानंतर आणि याबाबत बातमी प्रसिद्ध करताच येथील प्रशासनाला जाग येऊन कर्मचाऱ्यांनी येथील दोन झरे आणि एका विहिरीच्या दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले आहेत. (RGPPL Management take Sample of polluted water from Anjanvel)
रत्नागिरी गॅस आणि विधुत प्रकल्पातून 1999 सलाप्रमाणे अंजनवेल ब्राह्मणवाडी परिसरातील पिण्याच्या विहिरी व झऱ्यातून दूषित पाणी मिक्स झाल्याने येथील पिण्याचे पाणी मचूळ व खारट झाले होते. सदरील पाणी तवंग युक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक बनले आहे.
याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच शनिवारी आरजीपीपीएल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी प्रत्यक्ष आले होते. पाण्याचे नमुने घेण्यात आले. यावेळी त्यांना ग्रामस्थांनी संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. डीसेंबर १९९९ साली झालेल्या द्रवरूप नाफ्ता प्रदूषणाची दाहक पार्श्वभूमी देखील लक्षात आणून दिली.आणि या भागातील झरे व विहिरी याच्या पाणी नमुने तपासणीचा लेखी अहवाल आम्हाला प्राप्त व्हावा अशी मागणी केली आहे. कंपनीकडून याविषयी योग्य ती कारवाई तातडीने होणे आवश्यक आहे याची अधिकारी वर्गाला जाणीव करून दिली. त्याचप्रमाणे प्रदूषित भागाला पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपी सोय करावी अशी मागणी लावून धरली आहे.
याभागात राहणारे ग्रामस्थ यांच्या आंबा, काजू, नारळ, सुपारी, केळी अन्य बागायती पिकांसाठी येथील झरे आणि विहिरी यातील पाण्याचा वापर गेली अनेक वर्षे केला जात आहे. या पिकांवरच या ग्रामस्थांच कायमच उत्पन्न अवलंबून आहे. क्षारयुक्त प्रदूषित पाण्याची समस्या यापुढे दूर झाली नाही तर येथील ग्रामस्थांचे बागायती क्षेत्र आणि पीक धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. क्षारयुक्त पाण्याचे प्रवाह नेमक्या कोणत्या भागातून प्रवाहित झाले आणि त्यानंतर ब्राह्मणवाडी येथील झरे आणि विहिरी प्रदूषित झाल्या याबाबत अद्याप कंपनी प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण अंजनवेल गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी ग्रामपंचायत अंजनवेल यांच्या मालकीची मुख्य विहीर देखील ब्राह्मणवाडीमध्ये नदीजवळ आहे. या विहिरीतून पंपाद्वारे प्रत्येक वाडीमध्ये नळपाणी योजनेचे पाणी अंजनवेल ग्रामपंचायतीकडून नियमित पूरवले जाते. क्षारयुक्त प्रदूषित पाणी जर या विहिरीमध्ये मिसळले तर मात्र ऐन उन्हाळ्यात संपूर्ण अंजनवेल गावाचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तातडीने आरजीपीपीएल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाय योजना करणे आवश्यक आहे. अशी मागणी यावेळी ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी अधिकारी वर्गाकडे केली आहे.