रत्नागिरी – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त टिळक जन्मस्थान स्मारकाचे पुनरुज्जीवन होणार आहे. तसेच टिळक मेमोरियल विभागीय ग्रंथालयही आधुनिक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपकेंद्रात टिळक अध्यासनाची सुरवात झाली. या साऱ्याला जवळपास १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
लोकमान्यांच्या जन्मगावी होत असलेल्या या रचनात्मक कार्यामुळे रत्नागिरीचे नाव अधिक उंचावणार असून विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपपरिसरामध्ये टिळक अध्यासन (अभ्यास व संशोधन केंद्र) सुरू झाले. या माध्यमातून एमए राज्यशास्त्र व पत्रकारिता आणि वैदिक मॅथेमॅटिक्स, अॅस्ट्रोनॉमी व गीतारहस्यच्या सर्टिफिकेट कोर्सला आणि डिप्लोमा इन मास मीडियाला मंजुरी मिळाली. एमए राज्यशास्त्राकरिता निवडता येतील अशा पेपरमध्ये टिळकांच्या कार्याच्या संदर्भातील विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांना टप्प्याटप्प्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती उपपरिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, टिळकांच्या संबंधी निबंध, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातील. कालांतराने हे अध्यासन एक महत्त्वाचे सुसज्ज संशोधन केंद्र म्हणून उभे राहिल. येथे अद्ययावत ग्रंथालयही साकारण्यात येणार आहे. याकरिता एकूण ५० लाख रुपये मंजूर आहेत. लोकमान्यांनी जीवनात वैदिक गणित, पत्रकारिता अशा अनेक विषयांचा गाढा अभ्यास केला. त्यातील काही विषयांवर कोकणातील विद्यार्थी येथे नक्की अभ्यास, संशोधन करतील.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाजवळील लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे १ मे १९७२ रोजी अर्थमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर येथे १९७६ पासून महाराष्ट्र शासनातर्फे विभागीय ग्रंथालय सुरू करण्यात आले. तेथे ई- वाचन साहित्यासाठी टॅबलेट खरेदी, मुलांसाठी डिजिटल ग्रंथालय साकारण्यात येणार आहे. तसेच खिडक्या, दरवाजे, स्लॅब, संरक्षक भिंत दुरुस्ती, रंगकाम, प्रवेशद्वार, सुरक्षारक्षक कक्ष, जनरेटर, इन्व्हर्टर व्यवस्था, उद्यान सुशोभिकरण, पार्किंगची सुविधा देण्यात येणार आहे. सीसीटीव्ही, प्रकाशयोजना आदी कामे करण्यात येणार आहेत. लोकमान्यांच्या संदर्भातील ही सर्व कामे अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून एक वर्षाच्या आत पूर्ण करावीत. तसेच कामांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करून दरमहा आढावा घेण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले आहेत.
ग्रंथालयाचे नुतनीकरण
सव्वाचार कोटी रुपये खर्चून ग्रंथालयाचे नुतनीकरण केले जाणार आहे. यामध्ये डिजीटलायझेशन व ई ग्रंथालय निर्माण करण्यात येणार आहे. टिळकांच्या तैलचित्राचे सुशोभिकरण, म्युरलही (भित्तीचित्र) साकारण्यात येणार आहे. स्वयंचलित विद्युत व्यवस्था, पुस्तके ठेवण्यासाठी रॅक, सुसज्ज वाचनकक्ष यांचा समावेश आहे. येथे एकूण पुस्तके, ग्रंथसंख्या १ लाख १२ हजार ३१० आहे. वर्गणीदार सभासद ६०, संस्था सभासद ४९, ऑनलाइन बुक एंट्री ८४४२ व ऑफलाईन बुक एंट्री ३४८० आहेत. येथे सर्व दैनिकांसह साप्ताहिके व मासिके येतात.
लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी रत्नागिरीत भरीव कार्य व्हायला हवे, अशी सूचना मी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी जन्मस्थानासाठी भरघोस निधी, टिळक ग्रंथालयाचे नूतनीकरण आणि टिळक अध्यासन यासाठी निधी मंजूर केला, हे विशेष. यानिमित्ताने रत्नागिरीत टिळकांची स्मृती जतन करण्यासाठी रचनात्मक कार्य होत असल्याबद्दल आनंद वाटतोय.
– अधिवक्ता विलास पाटणे