अरुण परचुरे ; ट्रस्टने दर्शनासाठी तयार केली नियमावली
गुहागर, ता. 15 : शासनाचा आदेशाप्रमाणे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर आणि श्री दुर्गादेवी आदी मंदिरे आजपासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. श्रावण सोमवारांइतकेच कार्तिक महिन्यातील सोमवारांचे महत्त्व आहे. त्यामुळे पहिल्या कार्तिक सोमवारी व्याडेश्वराचे दर्शन घेण्याची संधी भक्तांना मिळाली आहे. तर दिवाळीची सुट्टी असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना व्याडेश्र्वर दुर्गादेवीचे दर्शन घेता येणार आहे.
सोमवारपासून मंदिरे खुली होणार आहेत. असा निर्णय आल्यानंतर श्री व्याडेश्र्वर देवस्थानच्या ट्रस्टींनी सभा घेवून दर्शनासंदर्भातील रुपरेषा ठरवली. मंदिर प्रवेशासाठी फक्त दक्षिणेकडील मुख्य दरवाजा उघडण्यात येणार आहे. भक्तांना हात सॅनिटाईझ करुन, हातपाय धुवून, थर्मामिटरने तापमानची तपासणी करुन आणि मास्क असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी मंदिरामध्ये सहा फुटावर खुणा करण्यात आल्या आहेत. दर्शनानंतर अंगारा व तिर्थ मिळणार नाही. तसेच मंदिरात बसण्यास किंवा इतरत्र स्पर्श करण्यास देवस्थानने बंदी केली आहे. मंदिरे खुली झाल्यामुळे धार्मिक विधी देवस्थानने सुरु केले आहेत. एकावेळी ४ यजमांनांना प्रत्यक्ष श्री व्याडेश्र्वराची पुजा अभिषेक करता येणार आहे. त्याचप्रमाणे लघुरुद्र आदी कार्यक्रमांसाठी देवस्थानने भक्तनिवासामधील परशुराम सभागृह खुले केले आहे. तेथे बसून पुरोहितांना रुद्र आवर्तने करता येणार आहेत. मात्र धार्मिक विधींसाठी बाहेरुन हार, प्रसाद, नारळ, फुले आदी साहित्य आणण्यास देवस्थानने परवानगी दिलेली नाही. ज्येष्ठ नागरिक, १० वर्षाखालील मुले, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ति यांनी शक्यतो मंदिरात दर्शनासाठी येवू नये अशी विनंती व्याडेश्र्वर देवस्थानने केली आहे.
कार्तिक महिन्यात सोमवारी व्याडेश्र्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला गोव्यातील भक्त व्याडेश्र्वर मंदिरात उत्सव करतात. सुमारे 50 वर्षांपूर्वीपासून ही प्रथा सुरु आहे. गोव्यातील मंदिरे आधीच सुरु झाल्यामुळे गोवेकर सातत्याने देवस्थानकडे त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवाविषयी आग्रह धरत होते. आज शासनाने मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी अजुनही देवस्थानने त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवासंदर्भात निर्णय घेतला नाही. शासनाच्या अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करुन त्याबाबतचा निर्णय नंतर घेणार असल्याचे व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे यांनी सांगितले.