रत्नागिरी : पीक पेरा नोंदणीसाठी शासनाने ‘ई-पीक पाणी’ अॅप सुरू केले आहे. या अॅपवर जिल्ह्यातील ९४ हजार ०४७ शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. नेटवर्क, अॅंण्ड्रॉईड मोबाईल आदीची अडचण होती. मात्र त्यावर मात करून नोंदणीमध्ये ही प्रगती झाली आहे. ८७ हजार १०७ शेतकऱ्यांनी याचा प्रत्यक्ष वापर सुरू केला असून ६ हजार ९४५ शेतकरी वापर न करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना तलाठ्यांसह काही महसूल अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होत नाही. त्यासाठी त्यांना बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केला जाणार आहे. पळवाट काढणाऱ्या अधिकाऱ्यांना आहे, त्या भागात थमद्वारे हजेरी लावणे अनिवार्य केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, शेतकरी घेत असलेली पिके, फळबाग, बांधावरची झाडे यांची ई-पीक अॅपवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन नोंद घेण्यात येत आहे. पारदर्शकतेसाठी हे अॅप शासनाकडून विकसित केले आहे. यावर पिकाची माहिती भरण्यापूर्वी सर्व्हे नंबरची माहिती काढून ठेवावी लागते. शेत जमिनीची अचूक जागा, गाव नमुना आठ अ, सात-बाराही आवश्यक असतो. शेतात मोकळ्या जागेत उभे राहून फोटो घेऊन अक्षांश व रेखांश घेतले जातात. कृषीसह महसूल विभागाकडून हे काम सुरू आहे. याला जिल्ह्यात कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र तो वाढविण्यात यश आले आहे. जिल्ह्यात २० लाख सात-बारांचे संगणकीकरण झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार ते शेतकऱ्यांना मोफत वाटप केले जात आहेत. डाऊनलोड केलेले सात-बारा ३ लाख आहेत. ६० हजार सातबारांची प्रिंट काढली असून १६ हजार ७२० डिझिटल सात-बारा उतारांचे वाटप करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात अजूनही नेटवर्कचा प्रश्न असल्याने डिजिटल सात-बारा मिळत नाही. तेथील तलाठ्यांकडे ग्रामस्थ फेऱ्या मारून थकतात. तरी तलाठी भेटत नाहीत, अशा तक्रारी आहेत. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आमच्याकडेही या तक्रारी आल्या आहेत. त्यावर लवकरच उपाययोजना केल्या जाणार आहेत. बायोमेट्रीक हजेरी सक्तीची केली जाणार आहे. तलाठी किंवा अन्य अधिकारी पळवाट सांगत असले तर त्याला ज्या भागात आहे, तेथे थम लावण्यास सांगितले जाईल. त्यामुळे संबंधित तलाठी, अधिकारी कामावर हजर आहे की नाही हे स्पष्ट होईल.