प्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांचे आवाहन
गुहागर : भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची पहिली जिल्हा कार्यकारणी ब्राह्मण सहाय्यक संघच्या कै. बाबासाहेब बेडेकर हॉल चिपळूण येथे संपन्न झाली. निमंत्रितांच्या बैठकीत प्रदेश चिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी डॉ. नातूंच्या नेतृत्वाखाली उत्तर रत्नागिरीत भाजपा घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पार्टीने नियोजनबद्ध कामकाजाकरीता रत्नागीरी जिल्ह्याचे विभाजन करून चिपळुण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड या पाच तालुक्यांचा उत्तर रत्नागीरी जिल्हा निर्माण केला. नव्याने निर्माण झालेल्या या जिल्ह्याचे नेतृत्व गुहागर विधानसभेचे सोळा वर्षे नेतृत्व करणारे डॉ. विनय श्रीधर नातू यांच्याकडे देण्यात आले. यानंतर कोरोना महामारी संसर्ग सुरू झाल्यामुळे या नव्याने निर्माण झालेल्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी घेण्यात आली नव्हती. गुरुवार दि. १५ रोजी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूण तालुक्यात ब्राह्मण संघाच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभाग्रहात कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळत पहिली जिल्हा कार्यकारिणीची बैठक प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष डॉ. विनयची नातू यांच्या अध्यक्षत्येखाली संपन्न झाली.
या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्येच्या दृष्टीने जगात अग्रक्रमावर असणाऱ्या भारतामध्ये कोरोना रोखण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाय योजना या कालावधीत जनतेला थेट खात्यात दिलेले पैसे, अन्नधान्याचे नियोजन, त्याचबरोबरीने त्यांनी देशहितासाठी, देशाच्या संरक्षणासाठी घेतलेले निर्णय याबाबत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. संघटनात्मक दृष्ट्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून दिवंगत झालेल्या भाजप परिवारातील सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदेश पातळीवर निवड झालेल्या सौ. निलमताई गोंधळी, अॅड. मिलींद जाडकर, राजुभाई रेडीज यांचा सत्कार करण्यात आला. पाच तालुक्यातील तालुकाध्यक्ष व सरचिटणीस यांनी गेल्या पाच महिन्यात केलेल्या कामाचा आढावा सादर केला.
जिल्ह्याच्या वतीने ज्यांना विविध आघाड्यांची जिल्हास्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे ते किसान मोर्चा – संदीप गोरिवले, कामगार आघाडी- विनोद कदम, ओबीसी आघाडी – संतोष जैतापकर, वैद्यकीय आघाडी – मनोज रावराणे ,शिक्षक आघाडी – सोमनाथ सुरवसे, माजी सैनिक आघाडी – दीपक चव्हाण, युवा मोर्चा – संतोष मालप, प्रसिद्धीप्रमुख – संदेश ओक, महिला आघाडी – स्मिताताई जावकर, सरल अॅप संयोजक – मधुकर निमकर, सोशल मीडिया संयोजक – शार्दुल भावे, दिव्यांग सेलचे – कोळी सर या सर्वांनी आपली ओळख करून देत भविष्यातील आपले नियोजन यावेळी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा ट्रान्सपोर्ट सेल संयोजक म्हणून शृंगारतळी येथील महेश मुरलीधर कोळवणकर यांची नेमणूक जाहीर करून त्यांना प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या जिल्हा कार्यकारणी मध्ये नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व विषयांची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी उपस्थितांना दिली.
दुसऱ्या सत्रात प्रदेश चिटणीस, माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जठार यांनी नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी समाजातील शेवटच्या घटकाचा सुद्धा विचार करताना त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याकरिता ज्या उपाययोजना राबवत आहेत, त्याचा थेट लाभ भाजप कार्यकर्त्याने तळागाळात जाऊन शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवता येईल याचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत जेथे कोणीच गेले नाही, तेथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गेले पाहिजे. आपण कायमस्वरूपी कार्यकर्ता म्हणून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. या महाराष्ट्रातल्या महाभकास तिघाडी सरकारच्या विरोधात आपला कायमचा कार्यक्रम असला पाहिजे. ते करत असलेल्या चुकांचा आपण लाभ उठवला पाहिजे. केंद्रात असलेलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार लोकांच्या हिताच कस आहे हे आपण जनतेमधे जाउन सांगीतल पाहिजे. उत्तर रत्नागिरीला डॉ. विनय नातू यांच्या रुपाने तुम्हाला एक शांत, संयमी, अनुभवी, कणखर असे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण कामकाजाचा आपण सगळ्यांनी फायदा घेत या उत्तर रत्नागिरी मध्ये शतप्रतिशत भाजपाचे काम पुर्ण केले पाहिजे. भविष्यात भारतीय जनता पार्टीचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष यांची संख्या मोठी असली पाहिजे. यासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य प्रदेश व राष्ट्रीय स्तरावरून या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला मिळून देणार असल्याची खात्री त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली.
या जिल्हा कार्यकारणीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस रामदासजी राणे यांनी, तर आभार संघटन सरचिटणीस नागेश धाडवे यांनी मानले.