रविंद्र बागकर : क्रीडा, राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत
गुहागर : शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष, कबड्डीपट्टू आणि उत्कृष्ट क्रिकेटर, बैठक परिवरातील प्रवचनकार, बांधकाम व्यावसायिक रविंद्र बागकर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. गुहागर शहर एका उमद्या नेतृत्त्वाला पारखं झालं आहे.
रवींद्र बागकर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सेव्हन स्टार कब्बडी संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. कबड्डीचे अनेक सामने त्यांनी एकहाती फिरवले होते. या खेळाडूमुळे संघाला यश हे निश्चित मिळणार असा विश्र्वास संघातील प्रत्येक खेळाडुला वाटत असे. वय वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या की, खेळाडू खेळापासून दूर होतो. पण प्रत्यक्ष मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतरही नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करणं, संघ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी निभावणं, अशा विविध जबाबदाऱ्यांमधुन ते कबड्डीशी जोडलेले होते. कबड्डीप्रमाणे क्रिकेटच्या दुनियेतील षटकारांचा बादशहा म्हणून रवींद्र याची वेगळी ओळख होती. साईश्रद्धा बाग क्रिकेट संघातून अनेक सामन्यात रविंद्र बागकर यांनी प्रभावी फलंदाजी व भेदक गोलंदाजीने संघाला विजय प्राप्त करुन दिला आहे. त्यामुळेच आजही कबड्डी किंवा क्रिकेट सामने सुरू असल्यास बागकर यांना आदराने बोलविले जात होते. ग्रामदैवतांची पालखी गावात फिरु लागल्यावर गुहागरमधील भंडारी समाजात लोटण्याचा खेळ खेळला जातो. या खेळाच्या निमित्ताने तालुक्यातील समाज एकत्र होतो म्हणून त्याला समा असेही म्हटले जाते. लोटण्याच्या खेळात आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो तो सर्वाधिक खेळकऱ्यांना लोटणारा लोट्या. रविंद्र बागकर हे बागेतील १ नंबरचे लोटे म्हणून ओळखले जायचे. ही बिरुदावली जवळपास सहा वर्ष त्यांनी मानाने मिरवली.
खेळाबरोबरच राजकारणाचीही आवड त्यांना होती. या क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला. भाजपचे काम करत असताना शहरातील पक्ष संघटना वाढीचे काम केल्याने माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी गुहागर शहराध्यक्ष पदी त्यांची निवड केली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुहागर नगरपंचायत निवडणूकीत भाजपतर्फे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. यात पराभव झाला असला तरी त्यांनी दिलखुलासपणे विद्यमान नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचे अभिनंदन केले होते. राजकारणात आणि खेळात कधी हार कधी जीत असतेच हेच त्यांनी आपल्या खिलाडू वृत्तीने दाखवून दिले.
पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या बैठक परिवराचे काम ही रविंद्र बागकर करत होते. घरामध्ये नित्यनेमाने उपासना करण्याबरोबरच आठवड्यातून होणाऱ्या सामुहीक बैठकीलाही ते जात असतं. सातत्य, उपासना आणि दासबोधाचा अभ्यास यामुळे त्यांना प्रवचन करण्याचाही अधिकार मिळाला होता.
क्रीडा आणि राजकीय क्षेत्राबरोबरच रविंद्र बागकर सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांबरोबर सलोख्याचे संबध होते. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक असल्याने अनेक गावात व्यवहाराकडे न पहाता त्यांनी कामे करुन दिली. दुर्गादेवी देवस्थानतर्फे दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आली. या मदतीचे वाटप करण्यासाठी देवस्थानसोबत ते दुष्काळग्रस्त भागातही गेले होते.
गेले दोन चार दिवस ते चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी मध्यरात्री रविंद्र बागकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी गुहागर बाग त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. एक उत्साही, उमदं नेतृत्त्व हरपल्याने आज संपूर्ण शहरातवर शोककळा पसरली आहे.