गुहागर : तालुक्यातील बालभारती पब्लिक स्कूलच्या सभागृहामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयाचा आभासी पदभार सोहळा संपन्न झाला.
The virtual inauguration ceremony of the school was held in the auditorium of Balbharati Public School in the taluka under the chairmanship of Surjit Chatterjee, the headmaster of the school.
या कार्यक्रमासाठी बालभारतीचे वरिष्ठ अधिकारी, चेअरमन एस. के. भट्टाचार्य, बालभारतीच्या सचिव श्रीमती रेखा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असिमकुमार सामंता यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नेतृत्वाची प्रेरणा दिली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीवंदनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्तम स्वागत नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सर्वांसमवेत शपथ ग्रहण केली. यानंतर विद्यालयाच्या मुख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर विद्यालयाच्या चारही हाऊसचे कप्तान, उपकप्तान, कल्चर सेक्रेटरी, स्पोर्ट कप्तान यांची निवड केल्यानंतर, दुसरी ते दहावीच्या वर्गातून उत्तम विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुरजित चॅटर्जी, बालभारतीच्या सचिव रेखा शर्मा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रगीताने या आभासी पदभार सोहळ्याची सांगता करण्यात आली.