गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजे संभाजी साहित्य पुरस्कारासाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीची राजे संभाजी उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कारासाठी चार परीक्षकांनी निवड केली. यात डॉ. द. ल. फलके, डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, डॉ. राजाराम सोनटक्के, डॉ. सुवर्णा गुंड यांचा समावेश होता.
या कादंबरीस मिळालेला हा पाचवा पुरस्कार आहे. डॉ बाळासाहेब लबडे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. डॉ. बाळासाहेब लबडे हे येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात मराठी विभाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते साहित्यिक, समीक्षक, कवी, कादंबरीकार, संपादक, संशोधक, गीतकार आहेत. त्यांची आत्तापर्यंत १२ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना राज्यस्तरिय १८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कोकणातून, मराठी साहित्यापासून ते अमरिकेपर्यंत दखलपात्र ठरलेले साहित्यिक आहेत. सध्या प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमात त्यांची कविता आहे. विविध विद्यापीठांच्या अभ्याक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. आगामी दोन चित्रपटांना त्यांची गाणी आहेत. ते पीएचडी पदवीचे मार्गदर्शक आहेत. तीन विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात आली आहे. पिपिलिका मुक्तीधाम ही वैशिष्ट्यपुर्ण कादंबरी असून तिच्यावर चित्रपट निर्मितीचे काम चालू आहे. पिपिलिका मुक्तिधाम” विषयी दिग्गज समीक्षकांनी परीक्षणे लिहून तिची दखल घेतली आहे.