घरांमध्ये पाणी शिरले; रस्ते, पूल पाण्याखाली
जीवितहानी नाही, पण नुकसानी मोठी
गुहागर : गेले आठवडाभर जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाने मंगळवारी गुहागर तालुक्यात हाहाकार उडवला. गेली दोन दिवस धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे नदीनाले तुडुंब होऊन वाहू लागल्याने याचा फटका तालुक्यातील लोकवस्थीला बसला. गुहागर वरचापाट बाग सह, शृंगारतळी येथील घरांमध्ये पाणी घुसले. घरातील सर्व साहित्य भिजले तर अन्य साहित्य वाहून गेल्याच्या घटना घडल्या. तसेच गुहागर बस स्थानक परिसर, वेलदुर नवानगर येथील पूल, वरचापाट बाग पूल, पालशेत बाजारपेठ पूल यांच्यासह तालुक्यातील अन्य पुलांवरून पाणी जाऊन वाहतूक ठप्प झाली होती. काही ठिकाणी तर रस्ते पाण्याखाली गेल्याने खाजगी वाहनांसह गुहागर आगारातील बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले असून तालुका व नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती.


Water infiltrated the houses at Sringartali, including Guhagar Varchapat Bagh. Also, traffic was disrupted at Guhagar bus stand area, bridge at Veldur Nawanagar, Varchapat Bagh bridge, Palshet Bazarpeth bridge and other bridges in the taluka. Many people have suffered heavy losses due to this rain and the taluka and Nagar Panchayat administration was working to evacuate the citizens to safer places.
गेली आठवडाभर कोसळत असलेल्या पावसाने मंगळवारी गुहागरच्या इतिहासात प्रथमच पुराचे पाणी अनेक घरांमध्ये घुसण्याचा प्रकार घडला. आरे व गुहागर या दोन गावांना लागून असलेल्या नदीला पुर आल्याने गुहागर वेलदुर मार्गावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. सकाळपासून येथील ग्रामस्थांच्या ध्यानीमनी नसताना धोधो कोसळणाऱ्या पावसाने अचानक नदीला पूर येऊन घरात पाणी घुसून गणपती सणासाठी घरात भरलेले धान्य, इतर साहित्य भिजले. तसेच पुराच्या पाण्यात अनेक साहित्य वाहूनही गेले. बाग पुलावरूनही पुराचे पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुराच्या पाण्यामुळे घरात अडकून पडलेल्या नागरिकांना नगरपंचायतीचे कर्मचारी व जीवरक्षक प्रदेश तांडेल, निहाल तोडणकर व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. आरे येथील विनायक कळझुणकर यांचे घरातील सर्व सामान पुराच्या पाण्याने भिजले. त्यामध्ये दहा मण भातही भिजले. जनार्दन खोत यांचे घरातील भांडी पूरामध्ये वाहून गेली. आरे येथील शिवराम सोनार यांचे घरातील पुरामुळे फर्नीचर भिजले. धान्य, कपडे घरातील जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे. तसेच चंद्रशेखर बुगडी, अभिजित लिंगायत यांचे घरात पूराचे पाणी शिरले. सुवर्णा गुढेकर यांचे घरातील विक्री करीता ठेवलेले नारळ, फायटर कोंबड्या आदी वस्तू वाहून गेल्या आहेत. आरेगावच्या माजी सरपंच सिध्दी सुर्वे यांनाही पुराचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतीची नासाडी झाली आहे. आरे ब्राह्मणवाडी येथील केशव दिक्षीत यांचे घराच्या दोन्ही बाजूंचे डोंगर ढासळल्याने दिक्षीत यांचे बागेत पाणी शिरले. त्यामुळे नारळ, पोफळी अन्य झाडे उन्मळून पडली आहेत.


गुहागर बस स्थानक व रिक्षा स्टॅन्ड परिसरात पावसाचे पाणी साचले होते. मुसळधार पावसाचा फटका गुहागर- रत्नागिरी मार्गाला बसला. मार्गावरील वाहतूक बंद होती. आबलोली जवळील एका वळणावर नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प होती. एकाच ठिकाणी दोन तास वाहने उभी होती. शृंगारतळीमध्ये नाल्याचे पाणी थेट लोकांच्या घरात घुसण्याचा प्रकार घडला. त्यामुळे वृद्ध लोकं घरात अडकून पडली होती. स्थानिक ग्रामस्थांनी या वयोवृध्द नागरिकांना सुखरूप घरातून बाहेर आणले. पालपेणे फाट्यावरचा रस्ता पाण्याखाली गेला होता.
आबलोली रत्नागिरी मार्गावरील उंबरा शेजारील पुलावरून पाणी गेल्याने पुलासहित रस्ता पाण्याखाली गेला होता. मौजे साखरी बुद्रुक येथील श्री रमाकांत शंकर गायकर यांचे घराचे अंशतः नुकसान झाले आहे. कोंडकारूळ येथील श्री. दिणार गोविंद शिरगावकर यांच्या घराचे मागील पडवीवरती चिरेबंदी बांध पडून घराचे सुमारे 38 हजार 500 रू.चे नुकसान झाले. कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. तसेच नामदेव राठोड यांच्या घरावर बांध पडून घराचे नुकसान झाले आहे. आशिष राजाराम भोसले यांचा घराचा बांध कोसळले. स्वप्नील नांदलास्कर यांच्या घराचा बांध कोसळला. नवानगर येथील लक्ष्मण गंगाजी भोसले यांचे गाळ्यामध्ये पाणी गेल्याने सुमारे 20000/- चे नुकसान झाले आहे. रविंद्र जांभारकर यांच्या दुकान गाळ्यामध्ये पाणी शिरून 26 हजाराचे नुकसान झाले. भातगाव तिसंग येथील गंगाराम गणू सुवरे यांचे घरालगतचा बांध फुटल्याने घराची एक भिंत कोसळली.
या अतिवृष्टीचा फटका सागरी किनार्याला बसू नये म्हणून किनाऱ्यावरील ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या. सायंकाळी 7 वाजल्यानंतरही पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी किनारी असलेल्या गुहागर तालुक्यातील गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अतिवृष्टी मध्ये गुहागर तहसील कार्यालय, नगरपंचायत, ग्रामपंचायत प्रशासन सक्रियपणे कार्यरत असलेल्या दिसून येत होते. महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी व अधिकारी, कर्मचारी प्रत्येक गावात घडणाऱ्या घटनेकडे लक्ष ठेऊन होते. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत होता.

