महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पा न मारता महिलांना एकत्र करणे, बचतगट स्थापन करणे, अशा बचतगटांना काम देणे, उत्पादनांची निर्मिती करणे, उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणे. यासारखे उपक्रम गुहागरच्या सौ. रश्मी पालशेतकर राबवतात. त्यामुळेच गुहागर तालुक्यात 100 महिला बचत गट क्रीयाशील झाले. त्यापैकी काही गटांनी उत्पादने सुरु केली. या कामामधुन अनेक महिला आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम त्यांनी केले आहे.
सौ. रश्मी पालशेतकर यांना शाळा, कॉलेजपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे 2004 पासून महिला सबलीकरण, सक्षमीकरणाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रत्नागिरी यांच्यामार्फत गुहागर तालुक्यात बचतगटांच्या उभारणीचे काम त्यांनी स्विकारले. तालुक्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत पोचून तेथील महिलांना बचतगट योजनेची माहिती देणे, गट स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करणे. हे आव्हानात्मक काम होते. सौ. रश्मीताईंनी शासनाच्या मदतीची कोणतीच अपेक्षा न ठेवता गुहागर तालुक्यातील दुर्गम भागात स्वखर्चाने पायपीट केली. प्रत्येक गावात फिरून दारिद्र्य रेषेखालील महिलांना बचतगट स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले. महिलांना प्राथमिक उद्योग उभारण्यासाठी व त्याचा पाठपुरावा करण्याचे काम केले. शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात महिलांना सहभागी करुन घेतले. बचतगटांसाठी येणाऱ्या योजना यांची माहिती दिली. या मेहनतीमुळे तालुक्यात तब्बल 100 महिला बचतगट स्थापन झाले.
सौ. रश्मी पालशेतकर यांचं काम एवढ्यासाठीच कौतुकास्पद आहे की, त्यांनी आपली मोहिम केवळ बचतगटांच्या स्थापनेवर थांबवली नाही. या बचतगटांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी गटांच्या प्रमुख महिलांना घेऊन श्री स्वामी समर्थ गुहागर तालुका महिला बचतगट सहकारी संघाची स्थापना केली. ह्या बचतगटांना पुर्णपणे सक्षम करण्यासाठी महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले. बचतगटांना बँकेकडून कर्जाची पुर्तता करून दिली. लोणचे, मसाले, पापड, कागदी पिशव्या, कापडी पिशव्या, गोधड्या आदी सहज बनवता येतील अशी उत्पादने बचतगटांनी बनविण्याची दृष्टी दिली. बचतगटांना उद्योग प्रशिक्षण दिले. त्यामुळेच आज 100 बचतगटांपैकी 70 बचतगटांनी आपले छोटे उद्योग उभे केले आहेत.
खेडेगावात बचतगटांतून काम करणाऱ्या महिलांनी जग बघावे. राज्यातील अन्य महिला कसे काम करतात ते पहावे. स्पर्धेत उतरण्याची बचतगटांची मानसिकता बनावी. यासाठी तालुक्यातील महिलांना शासन आयोजीत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय बचतगटांच्या प्रदर्शनामध्ये सहभाग मिळवून दिला. बचतगटांना मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनात नेले. दापोली येथील पालवी महोत्सव, गणपतीपुळे येथील पर्यटन महोत्सव याठिकाणी नेऊन बचतगटांच्या व्यवसायाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम केले आहे. यामध्ये कोकणी जेवण, उकडीचे मोदक, आंबोळी, घावणे याचा स्वाद पर्यटकांना चाखायला दिला आहे. त्यातून बचतगटाच्या महिलांना अजुन जोमाने काम करण्याची स्फुर्ती, आत्मविश्र्वास मिळाला.
श्री स्वामी समर्थ गुहागर तालुका महिला बचतगट सहकारी संघाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार करणार्या महिला बचतगटांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम सौ. रश्मी पालशेतकर करत आहेत. त्यासाठी कोकणस्वाद हा ब्रॅण्ड त्यांनी बनविला आहे. या ब्रॅण्डद्वारे रत्नागिरीसह मुंबई, पुणे अशा शहरातून बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली आहे.
जिद्द, चिकाटी, योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यामुळे बचतगटांमधील महिलांची प्रगती होत आहे. गुहागर तालुक्यात बचतगट भवन व्हावे असे उद्दीष्ट बचतगट सहकारी संघाने ठेवले आहे. या भवनामुळे तालुक्यातील बचतगटांना हक्काची वास्तु मिळणार आहे. या कामातही सौ. रश्मी पालशेतकर यांनी स्वमालकीची जागा उपलब्ध करून दिली आहे.
संवेदनशील रश्मीताई
महिलांमध्ये काम करत असताना स्वाभाविकपणे महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचे विषय त्यांच्याकडे यायचे. हा माझा विषय नाही असे सांगून सौ. रश्मीताईंना दुर्लक्ष करता आले असते. पण स्त्रीचे दु:ख ऐकल्यानंतर सौ. रश्मीताई स्वस्थ बसु शकल्या नाही. अशा भगिनींना महाराष्ट्र राज्य महिला आयोगापर्यंत नेऊन योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सौ. रश्मीताई करतात. महिला समुपदेशन केंद्र सुरु करून महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्नही त्या करत आहेत.