गुहागर : ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर या सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षीचा हा पुरस्कार मार्गताम्हाने महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुरेश सुतार यांना जाहीर झाला आहे.
कोरोनाच्या संकटकाळात शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी येण्याचे थांबले. अशावेळी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संधी देण्यासाठी मार्गताम्हाने येथील नातू महाविद्यालयाने अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये कोरोना जागृती माहितीपटाची निर्मिती, भारतीय कला व संस्कृती यावरती देशपातळीवर प्रश्नमंजुषा, स्वातंत्र्य दिनी देशभक्ती वरती देशपातळीवर प्रश्नमंजुषा या उपक्रमांमध्ये डॉ. सुरेश सुतार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयात फोरम फॉर व्हॅल्यू एजुकेशनची निर्मिती त्यांनी केली. या फोरमद्वारे लेखक, कवी व समाजसुधारक यांची जयंती, पुण्यतिथी वेगळ्या ढंगाने साजरी करत विद्यार्थ्यांपर्यंत या व्यक्तीचे कार्य पोचविले. महाविद्यालयात आऊटरिच सेंटर सुरु करून समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवरती प्राध्यापकांना महाविद्यालयाबाहेर व्याख्याने देण्यासाठी व्यासपीठ तयार केले. महाविद्यालयाला NAAC ची चांगली ग्रेड मिळवून देण्यात NAAC कोओर्डिनेटर म्हणून त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
डॉ. सुरेश सुतार यांनी सामाजिक विषयावरती दैनिकांमध्ये लेख, दिवाळी अंकासाठी कथा लेखन केले आहे. याशिवाय व्यक्तिगत पातळीवर अनेक गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे. उच्च शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी मार्गताम्हाने परिसरातील विद्यालयामध्ये त्यांनी व्याख्याने दिली. मंदिर जीर्णोद्धारासह अनेक संस्थांना आर्थिक मदत ही केली आहे.
ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या पुरस्कारासाठी राज्यभरातून अनेक प्रस्ताव आले होते. त्या प्रस्तावातून सुतार सरांनी निवड झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या काम अधोरेखित झाले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य खोत, अन्य सहकारी, कर्मचारी यांनी प्रा.डॉ. सुरेश सुतार यांचे अभिनंदन केले आहे.