२५ गावे १६९ वाड्यांचा समावेश
गुहागर : तालुक्यातील सन २०२०/२०२१ टंचाई कृती आराखड्यामध्ये २५ गावातील १६९ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच टँकरने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नळपाणी योजना दुरुस्ती, विहिरींचे वृद्धीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींचे वृद्धीकरण, विंधन विहिरींची दुरुस्ती अशा उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुहागर पंचायत समितीमध्ये पाणी टंचाई कृती आराखडा बैठक पार पडली. या बैठकीतून प्रत्येक गावातील पाण्याच्या समस्येवर सविस्तर चर्चा करत, त्या गावातील विविध योजनांची माहिती व त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा व उपयोजना आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी सुचवल्या. यापुढे केंद्र व राज्य सरकारने जल जीवन मिशन योजना राबवली असून यामध्ये सर्व योजना या पाणीपुरवठा विभागाकडून उभ्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक योजना जास्त काळ टिकेल अशा दर्जेदार उभ्या करूया असे आवाहन उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांना केले. तसेच योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सरपंच व तेथील लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
यावर्षीच्या टंचाई कृती आराखड्यात एकूण २५ गावातील १६९ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी तालुक्यातील सात गावांमधील २० वाड्याना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मासु, झोंबडी, सडे जांभारी, पाचेरी सडा, काताळे, धोपावे या गावांचा समावेश आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या वर्षी ५६ पाणी योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ३६ विहिरींचे वृद्धीकरण, १५ विहिरींचा गाळ उपसने तर ६४ विंधन विहिरींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, तहसीलदार लता धोत्रे, सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले,सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.