अतिवृष्टीने पूर्णतः नुकसान; मदतीची प्रतीक्षा
गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर येथील प्रकाश दत्ताराम शिलधनकर यांच्या घराचे अतिवृष्टी मुळे घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. घरावरील छप्परचा काही भाग कोसळला असून पूर्णतः घर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Prakash Dattaram Shildhankar’s house at Tavasal Agar in Guhagar taluka has been completely damaged due to heavy rains. Part of the roof of the house has collapsed and there is a possibility of the house collapsing completely.
घरावरील छप्पर कोसळण्याने पावसाचे पाणी घरात पडून घरातील वर्षभरासाठी असलेले धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे. घरातील मातीच्या भिंतीही पावसाने भिजून गेल्या असल्याने त्या कोसळत आहेत. या नुकसानग्रस्त कुटुंबाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवळकर व कार्यकर्त्यांनी भेट घेतली व घराची पाहणी केली. त्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गावातील लोकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. परंतु शासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत द्यावी. तसेच घरकुल योजनेंतर्गत घर द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने थोडीफार मदत केली पण ती तुटपुंजी आहे. त्यांनी सर्वच पक्षातील पदाधिकारी यांच्याकडे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी शासनाकडे मदतीची याचना केली आहे. तालुक्यातील सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या नुकसानग्रस्त कुटुंबाला शासन दरबारी आर्थिक मदत तसेच घरकुल योजनेंतर्गत घर मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी केले आहे.
यावेळी उमेश भाटकर, तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्निल कांबळे, रुपेश घवाळे, अभिजित पोफळे, विवेक जानवळकर आदी उपस्थित होते.