राजयोगिनी सुनंदा दीदी यांचे प्रतिपादन
गुहागर : आजच्या परिवर्तनाच्या काळात मानवी मनावर बुद्धीचे लगाम असणे आवश्यक असल्याचे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर व पुणे क्षेत्रीय संचालिका, ग्रामविकास प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजिका राजयोगिनी सुनंदा यांनी केले.
गुहागरमधील रंगमंदिर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय शाखेतर्फे त्यांचा महापरिवर्तनाच्या दिशेने या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ब्रह्मकुमारीच्या पुणे सेवाकेंद्र संचालिका व ज्येष्ठ राजयोगिनी नलिनी दीदी, गुहागर सेवाकेंद्र संचालिका शिल्पा बहनजी, चिपळूण सेवाकेंद्राच्या संचालिका दीपा बहन, कोल्हापूरच्या प्रतिभा बहन, इचलकरंजीच्या माधवी बहन, कोल्हापूरचे रघुनाथ भाई, जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कनगुटकर, उमा बारटक्के, स्नेहा वरंडे, पारिजात कांबळे, सोनल सातार्डेकर, रवी बावधनकर, कामिनी बावधनकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सेवाकेंद्रातर्फे करण्यात आले. दीपप्रज्वलन, महापरिवर्तनाच्या दिशेने नृत्यनाटिका सादर करण्यात आले. प्रास्ताविक ब्रह्मकुमारी जयश्री बहनजी यांनी केले. विश्वविद्यालयाच्या कार्याची व रचनेची माहिती त्यांनी दिली.यावेळी ब्रह्मकुमारी राजयोगिनी सुनंदा दीदी व ब्रह्मकुमारीच्या ज्येष्ठ राजयोगिनी नलिनी दीदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या, परमात्म्याचा शोध वृद्धापकाळात घेऊ असे सगळेच जण म्हणत असतात. मात्र जीवनकाळात परमात्मा पर्यंत पोहोचण्याची विधी न शिकता व त्याचा अभ्यास न करता अंत समयी त्यांच्याबरोबर बुद्धीयोग जोडता येत नाही व जीवन संपून जाते. लोक तक्रार करतात की, परमात्म्या सोबत बुद्धी जोडले जात नाही याचे कारण त्याची परमात्म्याचा परिचय नाही, त्याच्यासोबत प्रेम नाही व त्याच्यासोबत बुद्धियोग जोडण्याची विधी देखील त्यांना माहित नाही. जगात मानव मानवत प्रेम निर्माण होण्यासाठी त्यांची आत्मा ही खरी ओळख होणे गरजेचे आहे. आज जग महापरिवर्तनाच्या वाटेवर असल्याचे राजयोगिनी सुनंदा दीदी यांनी सांगितले.
ज्येष्ठ राजयोगिनी नलिनी दीदी म्हणाल्या की, स्वतःला देह समजून देशाभिमान बाळगू लागल्याने आपापसातील प्रेम व बंधुभाव कमी झाला आहे. आत्मविस्मृतीच्या स्थितीतून आत्मा स्मृतीकडे जाण्याची विधी स्वतः परमात्मा व सर्वात मला शिकवत आहेत. त्यासाठी या ईश्वरीय विश्व विद्यालयाचे निर्मिती करण्यात आली आहे. देहाभिमानातून विकार निर्माण होत असून आत्मस्मृतीतून मानव देव समान बनतो. प्रत्येक आत्मा गुणांच्या आधारावर हिरा अथवा दगड ठरते. शरीराचा कोणताहि अवयव विकारी असेल तर मानव तात्काळ उपचारासाठी वैद्याकडे धावतो. मात्र आत्म्याचे मन व बुद्धी हे अवयव आज विकारी बनलेले असताना त्यावर उपाय करण्यासाठी प्रयत्न करत नाही. त्यामुळे मानवाच्या जीवनात दुःख, अंधश्रद्धा व अंधकार पसरला आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश आवश्यक असून ईश्वरीय ज्ञान जीवन जगण्याची कला शिकवत आहे. यावेळी संतोष वरंडे व दीपक कनगुटकर यांनी देखील मार्गदर्शन केले.

