गुहागर : येथील समुद्रकिनारी जलसफरीचा आनंद घेणाऱ्या आठ पर्यटकांचा जीव वाचवणारा गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याला जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर रंगमंदिर येथे शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी प्रदेश तांडेल यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. एकट्याने ८ जणांचे प्राण वाचविण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. तांडेल याने याआधीही बुडणार्या अनेक पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत. गुहागरात येणारा पर्यटक सुरक्षित असल्याची खात्री तांडेल याच्या साहसी पराक्रमामुळे सर्वांना आली आहे. प्रदेश हा एक प्रकारे गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील देवदूत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय गुहागर यांच्यावतीने तांडेल याचा राजयोगिनी सुनंदा दीदी व राजयोगिनी नलिनी दीदी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला जीवनश्री प्रतिष्ठानचे सिद्धिविनायक जाधव, निलेश गोयथळे, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, अरुण मालप, मनोज बोले, सुधाकर कांबळे, मधुकर गंगावणे, गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कनगुटकर, ब्रह्मकुमारी गुहागर सेवा केंद्राच्या शिल्प बहनजी, उमा बारटक्के, पारिजात कांबळे, सोनल सातार्डेकर, रवि बावधनकर, कामिनी बावधनकर आदी उपस्थित होते.