कोरोना आपत्तीमुळे गाडगी, मडकी विक्रीविना 8 महिने पडून
गुहागर : कोरोना आपत्तीच्या कालावधीत गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील नांदगावकर कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. गेले 8 महिने विक्रीसाठी तयार केलेली शेकडो गाडगी, मडकी तशीच पडून आहेत. रोजगाराची हमी देणारे अन्य साधनच नसल्याने नांदगावकर कुटुंबिय हतबल झाले आहे.
पालपेणे कुंभारवाडीतील उदय नांदगावकर हे आपल्या आईच्या मदतीने आपला पारंपरिक गाडगी, मडकी, माठ, पणत्या, स्वयंपाकाची विविध मातीची भांडी बनवितात. त्यांच्या आजोळची ही परंपरा त्यांच्या आईने सासरी आल्यावर जपली, जोपासली ती आजतागायत. आईच्या मदतीने उदय नांदगावकर यांनी हा पारंपरिक कुंभार व्यवसाय जोपासला आहे.
रुक्मिणी नांदगावकर या वयाच्या 16 व्या वर्षापासून कुंभार व्यवसायात आहेत. आज त्यांचे वय 90 वर्ष असूनदेखील तितक्याच जोमाने आजही त्या फिरत्या चाकावर मातीला आकार देताना दिसून येतात. रुक्मिणी आजीना त्यांचा अपंग मुलगा उदय त्यांना या कामात मदत करतो. मातीची भांडी, चुली, गाडगी, माठ, मडकी बनविण्यासाठी लागणारी माती चिरेखाणीतून खणून आणावी लागते. मातीची वाहतूक व त्यापासून वस्तू बनविण्यासाठी नांदगावकर कुटुंबियाना खूप मेहनत घ्यावी लागते.
एकेकाळी ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान नसताना डोंगरातील बागायतीला पाणी मिळावे म्हणून छोटे छिद्र असलेली मडकी वापरली जायची. उन्हाळ्यात घरोघरी माठ असायचे. नारळी पोफळीच्या बागेला हातरहाटाने पाणी शिंपण्याच्या काळात छोट्या मडक्यांना भाव मिळायचा. परंतू बदलत्या काळात ही परंपरा लोप पावत आहे. आता मातीच्या वस्तु स्वयंपाकघरातून गृहशोभेच्या बनल्या. मातीच्या अशा वस्तूंची मागणी घटली. परंपरागत कुंभार काम बंद पडले. अशा परिस्थितही नांदगावकर कुटुंबियानी आजतागायत ही परंपरा टिकवली. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत नांदगावकर कुटुंबिय हा आपला मातीच्या वस्तू बनविण्याचा व्यवसाय करतात. या वस्तू विविध ठिकाणी ते विकतात. त्यातून दरवर्षी नांदगावकर कुटुंबियांना किमान 40 हजारांचे उत्पन्न मिळते होते. या उत्पन्नावर नांदगावकर कुटुंबचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यावर्षी 2020 मध्ये कोरोना आपत्ती आली. टाळेबंदीत त्यांनी तयार केलेल्या मातीची भांडी विक्रिविना पडून राहिली आहेत. त्यामुळे केवळ या उत्पन्नावरच अवलंबून असलेल्या नांदगावकर कुटुंबियांवर गेले 9 महिने उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान, उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाल्याने व दोन लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च असल्याने उदय नांदगावकर यांच्या पत्नीने मुंबई गाठून ओळखीने एका ठिकाणी घर मोलकरीण म्हणून काम स्वीकारले आहे. उदय नांदगावकर यांचा एक भाऊ त्याच्या सासरवाडीत रहातो. त्यामुळे पायाने अपंग असलेल्या उदय यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा भार आहे. घरात 90 वर्षांची आई, दोन मुले तर पत्नी मुंबईत मोलकरीण अशा काहीशा विचित्र अवस्थेत सापडले आहेत.