घेतलेले पैसे परत करण्याचे तहसीलदारांचे लाभार्थ्यांना पत्र
गुहागर : पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा शासनाने उगारला आहे. दरम्यान, घेतलेली रक्कम येत्या सात दिवसात सरकारी तिजोरीत जमा करावी, अशा गुहागर तहसीलदारांच्या पत्राने लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ सधन आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केल्याचं लक्षात आलं आहे.तसेच एकाच कुटुंबातील अनेकांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचे तसेच शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनि देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे. मुख्य म्हणजे एकाच कुटुंबातील पती-पत्नीने देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे आता समोर येत आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. सहा हजार रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. हा हप्ता दरवर्षी एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जातो.
चालू आर्थिक वर्षातील दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. तर आता तिसरा हप्ता सरकारकडून डिसेंबर २०२० मध्ये पाठवण्यात येणार आहे.
पीएम किसान सन्मान योजनेच लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये वर्षाला हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार जमा होतात
सर्वच शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर त्यांची जमीन असली पाहिजे. जर एखादी व्यक्ती शेती करत असेल, पण त्याच्या नावावर शेतजमीन नसेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही.याशिवाय, जर एखादी व्यक्ती शेतकरी आहे पण ती सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी सेवेतून निवृत्त झाला आहे. तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच, एखाद्या व्यक्तीला मासिक पेन्शन 10 हजार मिळत असेल तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. सहाजिकच ज्या नागरिकांनी या योजनेतून बोगस अर्ज भरले आहेत त्यांना चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आम्ही पैसे मागायला गेलो नव्हतो
दरम्यान, तालुक्यातील अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत. कृषी विभागाने तालुक्यातील काहींचे या योजनेसाठी थेट माहिती महसूल विभागाला दिली होती, असे सांगितले जाते. योजनेचे कोणते निकष आहेत याची माहितीसुद्धा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्हती. मात्र, गुहागर तहसील कार्यालयाकडून पत्र आल्यावर या लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पत्रात म्हटले आहे की, पीएम किसान योजनेतील निकषानुसार आपणास अपात्र लाभार्थी घोषित करण्यात येत आहे. तरी आपल्या कडून पीएम किसान योजनेच्या रुपये दोन हजार प्रमाणे त्याची रक्कम सरकारी तिजोरीत येत्या सात दिवसांच्या आत जमा करावी. या पत्रावर आम्ही या योजनेचे पैसे मागायला गेलो नव्हतो. तुम्ही आमच्या खात्यात पैसे जमा केले होतात, असे सांगत लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.