अतुल काळसेकर; गुहागरमध्ये नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन
गुहागर, ता. 22 : महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ आत्मनिर्भर भारत मधुनच देण्यात येणार आहेत. असे प्रतिपादन सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. 21) गुहागरमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि सिंधु आत्मनिर्भर अभियानचे संयोजन अतुल काळसेकर यांनी नीलक्रांती नावाची पुस्तिका लिहिली आहे. या पुस्तिकेमध्ये मच्छीमार, मत्स्य शेतकरी यांच्यासाठी असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2020-25 ची संपूर्ण माहिती आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन जागतिक मत्स्यदिनाच्या निमित्ताने गुहागरमध्ये भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना अतुल काळसेकर म्हणाले की, आपल्याकडे कोणत्याही योजनेला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे. किंवा ती योजना आपल्यासाठी नाहीच अशी आपली मानसिकता आहे. त्यामुळे योजनांचे क्रियान्वयनाचे प्रमाण अत्यल्प आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2020-25 ही मच्छीमारांचे जीवन बदलुन टाकणारी योजना आहे. यामध्ये तलावामधील मत्स्यशेती, पिंजरा पध्दतीने मत्स्यशेती, शीतगृह, बर्फकारखाने, मत्स्य पदार्थ, मत्स्य खाद्य अशा विविध योजनांसाठी ४० ते ६० टक्के अनुदान आहे. कोकणातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सर्वांसाठी काही ना काही उद्योगनिर्मितीची संधी या योजनेत दिली आहे. मात्र आपल्याकडे योजनाच समजत नाहीत. म्हणून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुठा नदीच्या धरणात या योजनद्वारे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या 60 पेक्षा अधिक आहे. सांगली जिल्ह्यातील या योजनेचा फायदा मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला. तेव्हा आपणही ही पुस्तिका वाचुन येथे उद्योजक निर्माण करावेत.
मच्छीमार नेते विठ्ठल उर्फ बावा भालेकर यांनी योजना येतात पण आर्थिक साह्याला बँक तयार होत नसल्याची खंत यावेळी मांडली. तर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू म्हणाले की, भालेकर यांनी मांडलेली खंत योग्य आहे. मात्र बँक नाही म्हणते म्हणून प्रस्ताव करायचे थांबू नका. अनेक प्रस्ताव तयार होवू द्या. मग बँक नाही म्हणाली तर त्यांना तयार कसे करायचे हे आम्ही पाहु. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात किमान 50 उद्योजक या योजनेतून तयार करावेत. असे आवाहन यावेळी डॉ. विनय नातूंनी केले.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, रामदास राणे, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष जोगळेकर, धनगर आघाडीचे प्रदेश समन्वयक ॲड. मिलिंद जाडकर, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.