गुहागर : पहिला दमदार पाऊस म्हटला की, सर्वांना वेध लागतात ते चढणीच्या माशांचे. पावसाळयातील मासे म्हटले की, अनेक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातच चढणीच्या माशांची चव काही औरच असते. त्यामुळे खवय्ये आपले जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चढणीच्या माशांवर ताव मारतात. तर चढणीचे मासे पकडण्यासाठी खवय्ये नदी गाठून मज्जा घेत असतात.
यावर्षी जोरदार पावसाने नदी – नाले वाहू लागल्याने मोठया प्रमाणात चढणीचे मासे मिळू लागल्याने पाटपन्हाळे कोंडवाडी तसेच परिसरातील खवय्यांची मासे पकडण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. चढणीचे मासे खवय्यांकरीता पर्वणीच ठरत आहेत. पाऊस सुरु झाला की, पहिल्या आठ ते दहा दिवस मासे पकडणारी मंडळी वेगवेगळ्या युक्ती लावतात. काहीजण कोयणी तर काहीजण जाळ्याने मासेमारी करीत असतात. नदीवर मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्याने याठिकाणी बहुतांशी मंडळी मासेमारी करीत चढणीच्या माशांचा उपभोग घेतात. हे मासे पकडताना सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर वेगळाच हावभाव पहायला मिळत आहे. सध्या कोरोना विषाणूमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकजण हा आपआपल्या घरीच आहे. घरीच असल्याने त्याच त्याच मनोरंजनाच्या साधनांनी जो तो कंटाळला आहे. त्यातच जून महिन्याच्या सुरुवाती पासून पावसाने दमदार सुरवात केल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. याशिवाय मासे चढण्यासाठी चांगला पाऊस झाल्याने व योग्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे दिसून आल्याने तरूणाई मोठ्या प्रमाणात मासेमारी करून आनंद घेत आहेत. गुहागरसह आबलोली, पालशेत, वेलदूर अन्य भागात मासे पकडण्यासाठी नागरिक जात असल्याचे दिसून येते.