गुहागर : गुहागर-विजापूर या महामार्गावरील पाटपन्हाळे गाव सध्या मोडकाआगर पुलाच्या कामामुळे इतर गावांशी संपर्क तुटला आहे. पुल तुटल्याने या गावात वाहने येत नसल्याने नागरिकांना शृंगारतळीमध्ये जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
गुहागर – चिपळूण मार्गावरील पाटपन्हाळे हे एक महत्त्वाचे गाव असून येथे मोठी लोकवस्ती आहे. गेल्या वर्षापासून या मार्गावरील मोडकाआगर धरणावरील पूल नादुरुस्त झाल्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला. परिणामी चिपळूणकडे जाणारी वाहतूक आरे, रानवी, पवारसाखरी, पालपेणे मार्गे शृंगारतळी अशी वळविण्यात आल्याने पाटपन्हाळे वासियांना या वाहतुकीस मुकावे लागले आहे. जो मुळ रस्ता होता तो महामार्ग विभागाकडे गेला आहे. नवीन रस्ता करण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. संपूर्ण रस्ता उखडून गेला असून वाहने सोडा, साधे रस्त्याने चालणेहि कठीण होऊन बसले आहे. या गावातून कोणत्याहि गावात जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने येथील ग्रामस्थ प्रचंड हैराण झाले आहेत. शृंगारतळी किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना जादा पैसे मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. पुढील वर्षभर मोडकाआगर पुलाचे काम होणार नसल्याने संबंधित ठेकेदाराने पाटपन्हाळे ते शृंगारतळी रस्त्याचे किमान खड्डे भरून येथील ग्रामस्थांवरती मेहरबानी करावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.