गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे, तालुक्यातील डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशाताई, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा कोविड योद्धा म्हणून बुधवार दि. ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वा. ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सन्मानाचे आयोजन केले आहे.
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना आवाहन करून रोख रक्कम रक्कम देण्याचे जाहीर केले होते. या स्पर्धेमध्ये गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीतर्फे विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. कोरोना काळात ग्रामपंचायतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविले होते. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या काळात सामाजिक भावनेतून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेणार्या लोकांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान केला जाणार असल्याचे सरपंच संजय पवार यांनी सांगितले. ग्रामपंचायतीतर्फे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन ग्रामपंचायतीच्यावतीने गौरव केला जाणार आहे.