भाजपची मागणी, तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन
गुहागर : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होणेबाबतच्या मागणीचे निवेदन भाजपा गुहागर तालुक्याच्यावतीने गुहागर तहसिलदार,कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
परतीच्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्यातील शेतक-यांचे भात,नाचणी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे मानसिक खच्चिकरण झाले आहे. त्यांना या परिस्थितीतून सावरण्याकरता शेतीच्या नुकसानीचे सरसकट तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे.पुर्वानुभव लक्षात घेता हे पंचनामे डोळसपणे कोणतीही त्रुटी न ठेवता होणे गरजेचे आहे. काही शेतकऱ्यांनी नुकसान झालेली भातशेतीची कापणी लगेचच केली आहे त्यामुळे पंचनामा करताना त्याचा पण विचार होणे आवश्यक आहे. नाहीतर प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळतेवेळी “भिक नको पण कुत्र आवर” अशी शेतक-यांची अवस्था होते.एप्रिल महिन्यात व निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई गुहागर तालुक्यातील शेतकरी व बागायतदारांना आजपर्यंत मिळालेली नाही तर शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची अवस्था यापेक्षा काही वेगळी नाही.कोरोना संक्रमणाने होरपळलेल्या शेतकरी राजाला परतीच्या पावसाने दिलेला दणका हा फारच जोराचा असल्याने यातून सावरण्याकरता या शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होऊन मर्यादित कालावधीत त्याची शाश्वत भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावरून योग्य ती जलदगतीने कार्यवाही होण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, जिल्हा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप गोरिवले, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, कोषाध्यक्ष व नगरसेवक समीर घाणेकर, महिला आघाडी वैशाली मावळणकर,श्रद्धा घाडे, नरेंद्र वराडकर, अशोक बागकर, गणेश भिडे,युवा मोर्चा गुहागर शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष अमोल गोखले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.