गुहागर : तालुक्यातील पालशेत – निओशी ग्रुप ग्रामपंचायतीने ३१ ऑक्टोबर रोजी पालशेत विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेली ग्रामसभा दुसऱ्यांदा स्थगित करावी लागली. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
Palshet in Guhagar taluka – Gram Sabha organized by Nioshi Group Gram Panchayat on 31st October in the hall of Palshet Vidyalaya had to be postponed for the second time. The Gram Panchayat’s Village Development Officer and the Gram Panchayat’s administration have once again come to the fore.
तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायत सद्या या ना त्या कारणाने चर्चेत आहे. ग्रामपंचायतीमधील विकासकामांबाबत विरोधकांकडून आरोप असो वा ग्रामपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार यामुळे ही ग्रामपंचायत वादात आहे. २३ ऑगस्ट रोजीच्या शासनाच्या ग्रामपंचायतीला प्राप्त परिपत्रकानुसार ३० ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाली. त्यानंतर तब्बल महिन्याभराने ३० सप्टेंबर रोजी आयोजित केलेली तहकूब ग्रामसभा सन २०१९ – २०२० च्या जमाखर्चातील केवळ तीन अनुत्तरित विषयाताच कार्यालयीन वेळ संपल्याने स्थगित करावी लागली. ग्रामस्थांमधून उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांना ग्रामसेवक व सरपंच पर्यायाने ग्रामपंचायत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात तीन ठराव मंजूर केले. पालशेत ग्रामपंचायतीच्या इतिहासात ग्रामपंचायती विरोधात ग्रामसभेत ठराव होण्याची ही पहिलीच घटना असावी. ही सभा देखील स्थगित करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली. या स्थगित सभेचे आयोजन १ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मात्र, ही सभा देखील ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायतीला रद्द करावी लागली. पुन्हा हीच ग्रामसभा २७ ऑक्टोबर रोजी गोवर्धन मंदिर, रामाणेवाडी येथे आयोजित करण्यात आली. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेला शासन निर्णय धुडकावून मंदिरात आयोजित केलेली सभा देखील रद्द करण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर ओढवली. आता ही दुसऱ्यांदा स्थगित झालेली ग्रामसभा ३१ ऑक्टोबर रोजी पालशेत विद्यालयात घेण्यात आली.
दरम्यान, मागील स्थगित सभेतील अनुत्तरित प्रश्नापासून सुरू झालेल्या या सभेतही ग्रासेवकांसह सरपंच व ग्रा. पं. सदस्यांची भंबेरी उडाली. उपस्थित ग्रामस्थांमधून श्री. प्रशांत सुर्वे यांनी उपस्थित केलेल्या एकाही आक्षेपला कोणालाही उत्तर देता आले नाही. या सभेला पंचायत समिती, गुहागर तर्फे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले विस्तार अधिकारी श्री. केळस्कर उपस्थित होते. सरपंचांचे मानधन किती ? याचीदेखील माहिती ग्रामसेवक व सरपंच पर्यायाने ग्रामपंचायतीला नसावी यासारखे दुर्दैव ते काय? विचारण्यात आलेल्या प्रश्नावर नागरिकांना ठोस उत्तर देत आले नाही. कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, वेतनाबाबतचा प्रश्न इतकेच ग्रामपंचायतीच्या चहापान खर्चाबाबत सुद्धा समाधानकारक उत्तर ग्रामस्थांना मिळाले नाही. सरपंचांनी तर एकही प्रश्नाचे उत्तर देण्याचा साधा प्रयत्नही केला नाही.
ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अक्षरशः पोरखेळ चालविणाऱ्या ग्रामसेवक, सरपंच व पर्यायाने सर्व सदस्यांनी गावाच्या विकासकामांचा बट्ट्याबोळ केला आहे. ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार समोर आला आहे.