श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजन, तीस स्पर्धकांनी घेतला भाग
गुहागर : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत आयोजित किल्ले बनवा, किल्ले सजवा स्पर्धेत पाटावरची वाडी येथील ओम साईराम मंडळाने बनविलेल्या प्रतापगड किल्ल्याला प्रथम क्रमांक पटकावला. तर तर देवळेवाडीतील कार्तिक देवळे, प्रफुल्ल देवळे कुणाल देवळे या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या तिकोनागड किल्ल्याला विशेष परिपूर्ण किल्ला पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
पालशेत मधील यशवंत तथा नाना पालकर यांची वडिल कै. संभाजी रत्नु पालकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ पालशेत गाव मर्यादित खुल्या गटातील किल्ला बनवा, किल्ला सजवा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पालशेत गावातील 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह विविध मंडळांचा समावेश होता. कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती बनविली पाहिजे ही स्पर्धेची मुख्य अट होती. त्यामुळे स्पर्धकांनी टरनेटचा वापर करुन वेगवेगळ्या कोनातून किल्ला दिसतो कसा, किल्ल्यावरील प्रसिध्द इमारती, बुरुजांची संख्या, किल्ल्याचा इतिहास अशी सर्व माहिती गोळा करुन किल्ले बनविले होते.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी बोलताना आयोजन नाना पालकर म्हणाले 30 किल्ल्यांपैकी १० किल्ले उत्कृष्ट दर्जाचे होते. त्यामधुन निकाल लावणे ही परिक्षकांसाठीच परीक्षा झाली होती. चुरशीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक साईराम मंडळाने पटकावला. द्वितीय क्रमांक ओम औदुंबर बालकला मंडळ पालकर वाडीने बनविलेल्या जंजिरा किल्ल्याला मिळाला. तृतीय क्रमांक बाजारपेठेत रहाणाऱ्या विघ्नराज वासावेने बनविलेल्या रायगड किल्लाला मिळाला. गुरववाडीतील यश आणि सिमरन सावंत यांनी अजिंक्यतारा आणि बाजारपेठेतील वासावे व सवंगडी ग्रुपने बनविलेल्या प्रतापगड किल्ल्याला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. तर देवळेवाडीतील कार्तिक देवळे, प्रफुल्ल देवळे कुणाल देवळे या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या तिकोनागड किल्ल्याला विशेष परिपूर्ण किल्ला पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पारितोषिक विजेत्या संघाना आकर्षक चषक व रोख बक्षिसे देण्यात आली. तर प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या काही किल्ल्यांचे व्हिडिओ खाली देत आहोत.