मुंबई : राज्यातला करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी धोका मात्र कमी झालेला नाही. दररोज नवनवीन माहिती वेगवेगळ्या अभ्यासांमधून पुढे येत आहे. गेल्या १० दिवसांत राज्यातल्या वाढलेल्या करोना रुग्णांपैकी सुमारे २२ टक्के रुग्ण हे केवळ पुण्यातले असल्याची माहिती आता समोर आली आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान पुणे जिल्ह्यात एकूण ९,८१५ नवीन रुग्ण आढळले आहेत. अहमदनगरमध्ये ७,५५५ त्यानंतर साताऱ्यामध्ये ५,०३३, सोलापूरमध्ये ४,०६७ आणि मुंबईमध्ये ३,८४३ रुग्ण गेल्या दहा दिवसांत राज्यात आढळले आहेत. महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी अहवालाचे निष्कर्ष वर्च्युअल कॉन्फरन्समध्ये सादर केले. राज्यभरात, याच कालावधीत ४४,४३७ नवे करोना रुग्ण आढळले.
पुणे जिल्ह्यात साप्ताहिक रुग्ण बाधित आढळण्याच्या दरातही सतत वाढ दिसून येत आहे. राज्याचा रुग्ण बाधित आढळण्याचा दर २.७१ टक्के आहे. अहमदनगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि नाशिक हे इतर जिल्हे आहेत ज्यांचा रुग्ण बाधित आढळण्याचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.
अहवालात पुढे असे सांगण्यात आले की ४ सप्टेंबर रोजी धुळ्यात कोविड -१९ चा एकही रुग्ण आढळला नसला तरी नंदुरबारमध्ये फक्त एकच रुग्ण नोंदवला गेला होता. वर्धा, वाशिम, नागपूर, गडचिरोली, परभणी, हिंगोली, जळगाव, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ ह्या १७ जिल्ह्यांत १०० पेक्षा कमी कोविड रुग्ण आहेत.