आ. भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री, वन मंत्र्यांना पत्र
गुहागर : रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा शेतकरी- लाकुड व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व वन राज्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Forest Department to farmers and timber traders in Ratnagiri district, The old transport passbooks available at Ratnagiri should be made available immediately, Such a demand has been made by MLA Bhaskar Jadhav on behalf of Ratnagiri District Farmers-Wood Traders Association in a statement to the Chief Minister and Minister of State for Forests.
रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यापाऱ्यांना जळावू लाकूड, अनगड इमारती लाकूड, रिंगी, बांबू, विचाकाठी इ. लाकूड बाहेरगावी नेण्यासाठी वनविभाग, रत्नागिरी यांचेकडून वाहतूक पास दिला जातो. परंतु, कोरोना काळात बंद असलेली चर्नी रोड, मुंबई येथील शासकीय प्रिंटींग प्रेस अदयाप सुरू न झाल्यामुळे नवीन वाहतूक पासबुकांची छपाई झालेली नाही. वनविभाग, रत्नागिरी यांचेकडे शिल्लक असलेली पासबुके १५ दिवसांपूर्वीच संपली आहेत. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यापाऱ्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून नवीन पासबुकांची छपाई कधी होईल याची शाश्वती नसल्याने सर्व व्यावसायिक प्रचंड अस्वस्थ व संकटात आहेत. उत्पन्नाचा अन्य कोणताही मार्ग नसल्याने या शेतकरी व व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत रत्नागिरी जिल्हा शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत कैफियत मांडली आहे. वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे अगोदर चनलात असलेली जुनी वाहतूक पासबुके आहेत. ज्याप्रमाणे रायगड, सिंधुदुर्ग व सांगली जिल्हयामध्ये तेथील वनविभागाकडे अगोदर चलनात असलेली जुनी वाहतूक पासबुके तेथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली गेली. तशी आम्हालाही देण्यात यावीत, ही त्यांची मागणी आहे. रत्नागिरी जिल्हा शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेने केलेली मागणी रास्त असून जोपर्यंत नवीन वाहतूक पासबुकांची छपाई होत नाही, तोपर्यंत वनविभाग, रत्नागिरी यांचेकडे अगोदर चनलात असलेली जुनी वाहतूक पासबुके त्यांना उपलब्ध करून दयावीत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय सुरू राहिल आणि त्यांच्या आलेल्या संकटकाळात त्यांना काहीसा दिलासा मिळेल. तरी, याबाबत वनविभाग, रत्नागिरी यांना तात्काळ आदेश व्हावेत, अशी विनंती आ. जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरी – लाकूड व्यापारी संघटनेच्यावतीने आमदार भास्कर जाधव यांना होणाऱ्या गैरसोयीबाबत निवेदन देण्यात आले होते. याची तात्काळ दखल आ. जाधव यांनी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणकर यांच्याकडे व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, यासाठी पत्र दिले होते. शेतकरी लाकुड संघटनेच्यावतीने आ. जाधव यांचे आभार व्यक्त करून त्यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पालांडे- देशमुख, उपाध्यक्ष इम्रान घारे, इक्बाल मुकादम, सतीश दरेकर, रुपेश खांडेकर, मंगेश सोलकर, इरफान खेडेकर, सुजित मोरे, मयुरेश शिंदे, सूर्यकांत महाडिक, देवचंद जाधव आदींसह अन्य जिल्ह्यातील लाकूड व्यवसायिक उपस्थित होते.