3 नोव्हेंबरला निदर्शने, सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग
गुहागर : ओबीसींच्या प्रमुख मागण्यासाठी संघर्ष समितीच्यावतीने ३ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व तहसीलदारांना एकाचवेळी निवेदन देण्यात येणार आहे. गुहागरमध्येही तहसील कार्यालयासमोर संघर्ष समितीच्या वतीने निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनात तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाचे पूर्वतयारी व रूपरेषा ठरविण्यासाठी गुहागर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेच्या आबलोली येथील सभागृहात २२ ऑक्टोबरला सभा बोलविण्यात आली होती. या सभेला समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या सभेमध्ये ३ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी १० वा. गुहागर बस स्थानक येथे तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव जमा होणार आहेत. त्यानंतर तेथून गुहागर तहसील कार्यालयावर आंदोलनकर्ते ११ वाजता निदर्शने करणार आहेत.
यावेळी प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री यांना देण्यासाठी तहसीलदार सौ. लता धोत्रे यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाचे ओबीसीत समावेश करण्याला आमचा विरोध आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. जातनिहाय जनगणना करण्यात यावी. त्यातून ओबीसीची प्रत्यक्ष संख्या उपलब्ध होईल. त्यानुसार आरक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी लाभ व अन्य सुविधा ओबिसींना किती मिळत होत्या, किती दिल्या पाहिजेत याची स्पष्टता येईल. आर्थिक विकास महामंडळांना भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी. सर्व प्रकारच्या सेवा भरतीवरील स्थगिती उठवावी. भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी. आदी मुद्द्यांचा समावेश आहे.
तरी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी यावेळी उपस्थित राहून या आंदोलनाला यशस्वी करावे, असे आवाहन गुहागर ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे निमंत्रक पांडुरंग पाते यांनी केले आहे.