गुहागर : राज्य शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची आजपर्यंत ठराविक कामांसाठी ओळख होती. पण आता या योजनेअंतर्गत तब्बल 262 कामे घेणे शक्य होणार आहे. मनरेगातून आता गावातील विकासकामे मार्गी लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या योजनेची नीटपणे माहिती घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.
The Mahatma Gandhi National Rural Scheme of the state government was known till today for certain works. But now it will be possible to take 262 works under this scheme. It will now be possible to pave the way for development work in the village through MGNREGA. Therefore, everyone should know about this scheme properly, stated Zilla Parishad President Vikrant Jadhav.
सोमवारी गुहागर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. आज पर्यंत मनरेगा अंतर्गत आपण ठरावीकच विकासकामे करत होतो. परंतु यातुन अनेक काम करू शकतो. गुहागर तालुक्यात कार्यपत्रीका (जाॅबकार्ड ) धारक संख्या जास्त आहे. मात्र, त्यातील सक्रीय कमी आहेत. मनरेगा अंतर्गत कामासाठी ठेकेदार पद्धत नसल्याने त्यांना सक्रीय करण्याची गरज आहे. या योजनेचा सर्वांनी परिपूर्ण अभ्यास करून या योजनेतून काम करून जनतेला लाभ द्यावा, असे ते म्हणाले.
जनजीवन मिशन अंतर्गत ‘अ’ वर्गातील चार पैकी तीन गावांची तर `ब’ वर्गातील 114 पैकी 72 गावांची अंदाजपत्रके तयार आहेत. उर्वरीत गावाची अंदाजपत्रके तयार करून लवकरात लवकर पाठवावी अशा सुचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. कोरोनाची दुसरी लाट कमी करण्यासाठी व तीसरी लाट रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील हे वैद्यकीय अधिकारीनी सुचवावे, असे आवाहन त्यांनी केले.
1 ऑगस्ट पासून मच्छीमारी व्यवसाय सुरू होत आहे. तालुक्यात 2 हजार मच्छिमारांपैकी 545 जणांचे लसीकरण झाले आहे. ते मासेमारीसाठी बाहेर जाण्यापूर्वीच नियोजन करून त्याना प्रामुख्याने लसीकरण करावे, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. मच्छिमारांचे लसीकरण व्हावे यासाठी वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांनी एकमेव पाठपुरावा केल्याचे कौतुक अध्यक्ष जाधव यांनी केले.
तसेच शासनाच्या नियमानुसार झीरो पेंडीगची अंमलबजावणी मोहीम राबवत असून तात्काळ निर्णय घेण्यापुर्वी एक संधी देत आहे. काही ठीकाणी पदे कमी असल्यामुळे कामे झाली नाहीत. म्हणून कारवाई होणार नाही, ही चुकीची समज मनातून काढुन टाका. यापूर्वी दोघांवर कारवाई केलेली आहे,असा इशारा अधिकारी वर्गाला दिला. शासन निर्णयाप्रमाणे कामे करा. जनतेला एका कामासाठी सारख्या फेऱ्या मारायला लाऊ नका. खुर्चीत बसुन गरीबांना लवकर न्याय द्या. दर आठवड्याला एक, तर महिन्याला चार नवीन कामांची अंदाज पत्रके आली पाहिजेत. तसेच जिल्ह्याला आलेला निधी परत जाता कामा नये, असे विक्रांत जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांनी सद्याच्या तालुका वैद्यकिय अधिकारी श्री. चरके हे सतत आजारी असल्यामुळे कोरोना महामारीत आरोग्य विभागाला तालुक्याचे व्यवस्थापण करणे शक्य होत नाही. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्या जागी तरुण वैद्यकिय अधिकाऱ्याला संधी द्यावी, अशी मागणी केली.या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सभापती पुर्वी निमुणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, गटविकासाधिकारी अमोल भोसले, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, नेत्रा ठाकुर, पं. स. सदस्य सुनील पवार, पांडुरंग कापले,रवींद्र आंबेकर व अधिकारी वर्ग उपस्थीत होता.