![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2020/12/Kaul-Gramvikasacha.png)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2020/12/Kaul-Gramvikasacha.png)
गुहागर, ता. 23 : राजकीय पक्षाना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. यावेळी देखील ७ सदस्यांसह सरपंच पदाची निवडणूक उमराठ गावाने बिनविरोध केली आहे. फक्त गावाच्या निर्णयावर शासनाचा शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
गुहागर तालुक्यातील उमराठ हे छोटसं कोकणातलं खेडेगाव. सुमारे 450 लोकवस्ती असलेल्या या गावात आंबेकर वाडी, मराठवाडी, धारवाडी, कोडबीवाडी, बौद्धवाडी, घाडेवाडी, डागवाडी, जालगांवकर वाडी अशा 7 वाड्या आहेत. शेती हाच या गावाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. अन्य सोयी सुविधा नसतानाही संपूर्ण गाव कुटुंबाप्रमाणे रहाते. शिमगोत्सवातील संकासुराबरोबर 10-12 प्रकारची सोंगे खेळ्यात आणली जातात. हे या गावाचे वैशिष्ट्य.
गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीची स्थापना 1959 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत या गावात कधीही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यपध्दतीत अनेक बदल होत गेले. प्रभाग रचना. एकाच प्रभागातून सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण, त्यामध्ये 50 टक्के महिलांना आरक्षण, जनतेतून सरपंच असे सगळे बदल या गावाने सहज स्विकारत बिनविरोधची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. हा बदलही उमराठमधील ग्रामस्थांनी स्विकारला आहे.
गेली 60 वर्ष या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय येथील ग्रामस्थांना जाते. पूर्वी प्रभाग रचना नसताना गावकीत उमेदवार ठरवला जात असे. तालुक्याला जाणारा, चार शब्द लिहिता वाचता येणारा सरपंच बनायचा. प्रभाग रचना झाल्यावर प्रत्येक प्रभागातील ग्रामस्थ एकत्र बैठक घेवून उमेदवार ठरवायचे. नंतर गावकीत त्याला मंजूरी मिळायची. आरक्षण आल्यावर जातीचे प्रमाणपत्र असलेल्या प्राधान्य दिले गेले. हळुहळु वेगवेगळ्या कारणांनी जातीचे प्रमाणपत्र सर्वांकडे आली. मग निवडीचे नियम थोडे बदलले.
महिला आरक्षण आल्यावर ग्रामस्थांची थोडी अडचण झाली. पुरुषप्रधान संस्कृतीत गावात नेतृत्त्व करेल अशी महिला मिळणे कठीण. काही वेळ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असे आरक्षण पडल्यावर जातीचे प्रमाणपत्र असलेली महिला मिळणे कठीण. असेही प्रसंग आले. अशावेळी प्रभागांमध्ये उमेदवारांची अदलाबदल करण्याचे प्रयोगही गावाने केले. या सर्व निर्णयांना मंजुरी देण्याचे ठिकाण गावकी. हे मात्र आजपर्यंत कायम आहे. दोन दिवसांपूर्वीच उमराठ गावची गावकी झाली. 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी ७ उमेदवार निश्चित झाले. त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सध्या गावातील काही मंडळी करत आहे.
उमराठचे ग्रामस्थ केवळ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करत नाहीत. तर येथील ग्रामसभा देखील 150 पेक्षा जास्त संख्येच्या उपस्थितीने पार पडतात. कोरमअभावी ग्रामसभा तहकुब करण्याची वेळ आजपर्यंत या गावात आलेली नाही. ग्रामसभांमधील बहुतांशी निर्णय सर्वानुमते घेण्यात येतात.