108 रुग्णवाहिकेचे वाट बघणारे मरणाच्या वाटेवर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गुहागर : गुहागरसाठी दिलेल्या 108 रुग्णवाहिकेचा बोजवारा उडालेला आहे. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गुहागरमधील काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही मरणाच्या वाटेतून परत आले आहेत. या रुग्णवाहिकेची सेवा देताना अनेक कारणे पुढे केली जातात. एवढेच नव्हे तर महिला प्रसुतीसाठी 108 रुग्णवाहिका बोलविल्यास पाठविली नसल्याची परिस्थिती आहे. तसेच रुग्णवाहिकेचे चालक तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांची दिशाभूल करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. दरम्यान 108 रुग्णवाहिकेच्या दूर्लक्षित कारभारानंतरही तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत आवाज न उठवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरवेळी गुहागरमध्ये असलेल्या 108 रुग्णवाहिका बाबत कोणते ना कोणते कारण पुढे केले जाते. ही रुग्णवाहिका सुरुवातीला चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात उभी करण्यात येत असे. या ठिकाणी कोणत्याही कंपनीची मोबाइलची रेंज नसल्याने गाडी बोलताना अडचणी येत होत्या. त्यानंतर सदर रुग्णवाहिका शृंगारतळी ठिकाणी उभी करण्यात यावी, अशी मागणी गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत यांनी केली होती. श्री. सावंत यांनी या रुग्णवाहिका बाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र अन्य लोकप्रतिनिधी यांची त्यांना साथ मिळाली नाही.
कोरोना प्रादुर्भाव काळातही संशयित म्हणून सापडून आलेल्या रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. सरकारी गाडी असूनही खाजगी वाहने शोधावी लागली. काही दिवसांपूर्वी भातगाव येथील वयोवृद्धाला सापाने दंश केल्याने त्यांना तात्काळ रत्नागिरी येथे हलवण्यास सांगण्यात आले. 108 रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला असता गुहागरची रुग्णवाहिका ब्रेकडाऊन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हाला रत्नागिरी मालगुंड येथील 108 रुग्णवाहिका पाठवण्यात येत असल्याचे सांगितले गेले. दरम्यान, सदरील रुग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याने सदरील सापाने दंश केलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला दुसऱ्या वाहनाने पुढे हलवावे लागले. गुहागरच्या रुग्णवाहिकाबाबत अधिक माहिती घेतली असता, ही रुग्णवाहिका मार्गताम्हाणे येथे उभी असल्याचे समोर आले. याआधी ही अनेक अशा घटना घडल्या आहेत.
108 रुग्णवाहिकेच्या प्रशासन आणि चालकांच्या दुर्लक्षित कामकाजामुळे काहींना रुग्णवाहिका न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत, तर काही मरणाच्या वाटेतून परत आले आहेत. एकीकडे गुहागर सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णाला चिपळूण किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिली 108 रुग्णवाहिका मिळत नसेल तर या गाडीचा सर्वसामान्यांना काय उपयोग असा सवाल सर्वसामान्य रुग्णांनी केला आहे.