चिपळूणमधील एम. के. थिएटर मालकाचे सहकार्य
चिपळूण, ता. 21 : तालुक्यातील भारतीय स्त्री शक्ती आणि राष्ट्र सेविका समिती या दोन महिला संघटनांनी नाय वरनभात लोन्चा, कोण नाय कोन्चा (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटाला विरोध का हे थिएटर मालकाला समजून सांगितले. त्यानंतर स्त्री शक्तीचा सन्मान करत शर्मा पितापुत्रांनी तिकीट विक्री सुरु असलेल्या चित्रपटाचा शो रद्द केला. योग्य पध्दतीने समजावून सांगितले तर समाज चांगल्या गोष्टी ऐकतो हेच या घटनेने सिध्द झाले आहे.


नाय वरनभात लोन्चा, कोण नाय कोन्चा (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटाला सध्या अनेक महिला संघटना विरोध करत आहेत. चिपळूणमधील एम. के. थिएटर मध्ये हा चित्रपट दाखवला जाणार होता. ही माहिती कळताच भारतीय स्त्री शक्ती आणि राष्ट्र सेविका समिती या संघटनांच्या 15 महिलांनी एम. के. थिएटर गाठले. तेथे थिएटरचे मालक एम. के. शर्मा यांची भेट घेतली. नाय वरनभात लोन्चा, कोण नाय कोन्चा या चित्रपटातील कोणत्या गोष्टींना आक्षेप आहेत याची माहिती शर्मा यांना दिली. हा चित्रपट आपण प्रदर्शित करुन नये. अशी विनंती केली. यावेळी एम. के. शर्मा यांचा मुलगाही उपस्थित होता. महिलांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तातडीने थिएटर मालकांनी हा चित्रपट रद्द करु असे आश्र्वासन दिले. शर्मा यांच्या मुलाने तिकीट विक्रीच्या खिडकीवरील व्यवस्थापकांना तिकीट विक्री बंद करण्यास सांगितले. तसेच खिडकीवर असलेले चित्रपटाचे पोस्टर देखील काढून टाकले.


दरम्यान चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला भेटण्यापूर्वी भारतीय स्त्री शक्ती आणि राष्ट्र सेविका समितीच्या महिला कार्यकर्त्या चिपळूण पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. पोलीस निरीक्षक व अन्य अधिकारी एका मिटींगमध्ये असल्याचे महिला कार्यकर्त्यांना भेटु शकले नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याकडे त्यांना निवेदन द्यावे लागले. त्याचदिवशी प्रदर्शित होणारा चित्रपट (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) आपण कसा थांबवणार याचे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे या महिलांनी थेट चित्रपटगृहाला धडक दिली. भारतीय स्त्री शक्तीच्या सौ. अर्चना बक्षी आणि राष्ट्र सेविका समितीच्या चिपळूण शहर कार्यवाहिका सौ. स्मिता चितळे यांच्यासह 15 महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.
प्रत्येकवेळी आक्रमक होण्याची आवश्यकता नसते. समाजाला योग्य पध्दतीने समजावून सांगितले तर समाज ऐकतो. हेच या घटनेने सिध्द झाले आहे.
– सौ. अर्चना बक्षी, भारतीय स्त्री शक्ती