दुरावलेले पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय
गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षापासून दुरावलेले तळवली बौद्धवाडीतील शेकडो कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्तेही लवकरच राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे तालुकाध्यक्ष श्री. आरेकर यांनी सांगितले.
आमदार भास्करराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेक कार्यकर्ते पक्षापासून अलिप्त होते. तसेच काहीजण आमदार जाधव राष्ट्रवादी असल्याने सक्रिय दिसत नव्हते. मात्र, सद्या गुहागर विधानसभा मतदार संघाकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांनी लक्ष घातल्याने व तालुकाध्यक्ष पदाची धुरा राजेंद्र आरेकर यांच्याकडे आल्याने पक्षापासून दुरावले अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होऊ लागले आहेत. पक्षापासून दुरावलेले तळवली बौद्धवाडीतील हरिचंद्र गणपत पवार, सखाराम लक्ष्मण पवार, संदीप गुणाजी पवार, सुधीर पांडुरंग पवार, अनंत हरिचंद्र पवार, दिनेश यशवंत पवार, उमेश रामदास पवार, उज्वल जनार्दन पवार आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष यांची भेट घेऊन राष्ट्रवादी सक्रिय होत असल्याचे सांगितले. या सर्वांचे तालुकाध्यक्ष श्री. आरेकर यांनी स्वागत केले.
यावेळी गुहागर विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मंदार कचरेकर, तुषार सूर्वे, दीपक शिरधनकर, श्रीधर बागकर आदी उपस्थित होते.